Actor Ashish Warang Passed Away: अभिनेत्री प्रिया मराठेचं नुकतंच कॅन्सरमुळे निधन झालं. त्यानंतर आता सिनेविश्वातून आणखी एक वाईट बातमी आली आहे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणारे मराठी अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे. ते ५५ वर्षांचे होते.

अमिताभ बच्चन व अक्षय कुमारबरोबर काही लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते आशिष वारंग यांची आज, शुक्रवारी (५ सप्टेंबर) रोजी प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण ते काही काळापासून आजारी होते, अशी माहिती समोर येत आहे. यासंदर्भात फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिलं आहे.

आशिष वारंग यांच्या अकाली निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीतील कलाकारांबरोबर चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहते सोशल मीडियावर पोस्ट करून आशिष वारंग यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

आशिष वारंग हे ‘सूर्यवंशी’, ‘मर्दानी’, ‘सिम्बा’, ‘सर्कस’ आणि ‘एक व्हिलन रिटर्न्स’ यासारख्या अनेक हिट हिंदी चित्रपटांमधील सहाय्यक भूमिकांसाठी ओळखले जातात. बहुतांशी चित्रपटांमध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. त्यांच्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून त्यांना खूप प्रेम मिळालं होतं.

आशिष यांनी आपल्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन, आमिर खान, राणी मुखर्जी, अजय देवगण, अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग, आशुतोष राणा, जॉन अब्राहम, शिखर धवन आणि चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांसारख्या दिग्गजांबरोबर काम केलं होतं. आशिष वारंग या कलाकारांबरोबरचे फोटो व व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करायचे.