Sharad Ponkshe Praise The Taj Story : सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला अनेक चित्रपट आले आहेत. त्याचदरम्यान, परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेला ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपटही रिलीज झाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटावरून वाद निर्माण झाला होता आणि त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. ‘बाहुबली: द एपिक’, ‘थामा’ आणि इतर काही चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘द ताज स्टोरी’चं कौतुक होत आहे.
अशातच आता या सिनेमाचं मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी कौतुक केलं आहे. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या कामाबद्दलची माहिती शेअर करत असतात. तसंच आपली बिनधास्त आणि बेधडक मतंही व्यक्त करताना दिसतात. एखाद्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवरचं आपलं मत ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात.
अशातच शरद पोंक्षे यांनी परेश रावल यांच्या ‘द ताज स्टोरी’चं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. ‘द ताज स्टोरी’चं पोस्टर शेअर करत शरद पोंक्षे लिहितात, ‘द ताज स्टोरी’ हा प्रत्येक भारतीयाने पहावा असा सिनेमा आहे. तो अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने मांडला आहे. लेखक/दिग्दर्शक तुषार गोयल व निर्माता सुरेश झा यांना मानलं पाहिजे. परेशजी रावल आणि सर्वच कलाकारांनी चांगली कामं केली आहेत. हिंदू-मुस्लीम जोड न देता इतिहासाची तोडफोड करून जे दाखवले गेले, त्याविरुद्ध मांडलेले विचार आहेत. इतिहास किती महत्त्वाचा असतो, म्हणूनच तो योग्य व सत्य रूपानेच सांगितला गेला पाहिजे. सावरकरांचं वाक्य आठवलं, जे देश इतिहास विसरतात; त्यांचा भूगोल बिघडतो, अवश्य पाहा.”
शरद पोंक्षे यांची ‘द ताज स्टोरी’चं कौतुक करणारी पोस्ट
३१ ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाने आठवडाभरात १० कोटींची कमाई केली आहे. Sacnilk नुसार, या सिनेमानं पहिल्या दिवशी १ कोटी, दुसऱ्या दिवशी २ कोटी तिसऱ्या दिवशी २.७५ कोटींची कमाई केली. मात्र, चौथ्या दिवसानंतर कमाईत घट झाल्याचं पहायला मिळालं. या सिनेमाने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवशी अनुक्रमे १.१५ कोटी, १.६ कोटी आणि १.६ कोटी कमावले. सातव्या म्हणजे आजच्या दिवसाची आतापर्यंतची कमाई ०.५८ (यात बदल होऊ शकतो) इतकी आहे.
दरम्यान, ‘द ताज स्टोरी’चे लेखन आणि दिग्दर्शन तुषार अमरीश गोयल यांनी केलं आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. यात परेश रावल यांच्यासह झाकीर हुसेन, अमृता खानविलकर, नमित दास आणि स्नेहा वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ३१ ऑक्टोबरपासून हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
