Rani Mukerji Was First Choice For Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडमधील मोठं नाव आहे. त्यांची चित्रपट बनवण्याची पद्धत, कामाप्रति असलेली शिस्त या गोष्टींमुळे त्यांचं अनेकांकडून कौतुक होत असतं. त्यामुळे अनेकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते. अशातच आता लोकप्रिय गायक व अभिनेत्यानं त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

संजय लीला भन्साळी यांनी आजवर, ‘देवदास’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गंगूबाई काठियावाडी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यातीलच सर्वाधिक चाललेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘गंगूबाई काठियावाडी’. त्यामध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकलेली. परंतु, तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटासाठी आलिया भट्ट नाही, तर राष्ट्रीय पुरस्कारविजेती अभिनेत्री राणी मुखर्जीला पहिली पसंती होती आणि ती या चित्रपटात गंगूबाईच्या भूमिकेतून झळकली असती. त्याबद्दल लोकप्रिय गायक आदित्य नारायणनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

आदित्य नारायणनं नुकतीच ‘भारती टीव्ही’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यानं संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यासह त्यानं त्याचा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याच्याकडे काहीच काम नव्हतं याबद्दलही सांगितलं आहे. आदित्यने ‘शापित’ चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे तो कोणत्या परिस्थितीतून गेला याबद्दल सांगितलं. गायक म्हणाला, “शापित चित्रपटाच्या अपयशानंतर माझ्याकडे कोणतंही काम नसल्यानं मी काही तरी नवीन शिकायचं ठरवलं. मला लहानपणापासून संगीत आणि म्युझिक व्हिडीओ बनवण्याची आवड होती. त्यामुळे माझं लक्ष चित्रपट निर्मितीकडे गेलं. त्यावेळी सोनू निगमनं मला सुचवलं की, तू संजय लीला भन्साळींचा सहायक म्हणून काम का नाही करत?”

आदित्यनं पुढे सांगितलं, “मला ही कल्पना आवडली. मी संजय लीला भन्साळींना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मी काही दिवसांतच काम करणं सोडून देईन या विचारानं माझ्याकडे बघून स्मित हास्य केलं. पण, मला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. पहिल्या आठवड्यात त्यांनी मला कोणतंच काम दिलं नाही. त्यांना खात्री होती की, मी पटकन हार मानेन. पण, एक आठवड्यानंतर त्यांनी मला काम सांगायला सुरुवात केली.”

‘गंगूबाई काठियावाडी’साठी राणी मुखर्जीला होती पहिली पसंती

आदित्य पुढे संजय लीला भन्साळींबद्दल म्हणाला, “त्यावेळी त्यांच्याकडे ‘रामलीला’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ अशा दोन स्क्रिप्ट होत्या. मला असं वाटतं की, त्यांना ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट राणी मुखर्जीबरोबर बनवायचा होता. त्यांनी आम्हाला त्या दोन्ही स्क्रिप्ट दिल्या आणि कोणती चांगली आहे याबद्दल विचारलं. मला ‘रामलीला’ जास्त आवडलेली.”

काही वर्षांपूर्वी २०१९ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार प्रियांका चोप्राच्या नावाचीही ‘गंगूबाई काठियावाडी’साठी चर्चा सुरू होती. संजय लीला भन्साळींनी ‘बाजीराव मस्तानी’दरम्यान तिच्याबरोबर कामही केलं होतं. सुरुवातीला ‘गंगूबाई काठियावाडी’साठी रानी मुखर्जीला पहिली पसंती होती; परंतु तिच्याबरोबर गोष्टी जुळून न आल्यामुळे ‘बाजीराव मस्तानी’दरम्यान संजय लीला भन्साळींनी प्रियांकाला विचारलेलं; परंतु, प्रियांकाबरोबरही हा चित्रपट होऊ शकला नाही. नंतर अखेर आलिया भट्ट या चित्रपटातून मुख्य भूमिकेतून झळकली.