Pallavi Joshi Talks About Vivek Agnihotri : अभिनेत्री पल्लवी जोशी व विवेक अग्निहोत्री हे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतरच्या आठवणी सांगितल्या आहेत.
पल्लवी जोशी व विवेक अग्निहोत्री हे दोघेही सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यानिमित्ताने त्यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांचे पती विवेक तसेच त्यांच्या लग्नाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
पल्लवी जोशी यांची पती विवेक अग्निहोत्री यांच्याबद्दल प्रतिक्रिया
मुलाखतीत पल्लवी जोशी विवेक यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाल्या, “विवेक आयुष्यात आल्यानंतर मी खूप बदलले. सहिष्णुता खूप आली माझ्यामध्ये.” पुढे त्या गंमत करत म्हणाल्या, “ती मुलं झाल्यानंतर वाढतेच. त्याच्या आणि माझ्या आवडी निवडींचा समन्वय खूप चांगला झाला. त्यालाही पुस्तकांची आवड, मलाही पुस्तकांची आवड. त्याला सिनेमाची आवड आहे मलासुद्धा सिनेमाची आवड आहे. आम्हाला दोघांनाही संगीताची आवड आहे. आमच्या आवडी-निवडी सारख्या असल्या तरी त्याला ज्या प्रकारची पुस्तकं, संगीत, सिनेमा आवडतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे जॉनर मला आवडतात.”
पल्लवी जोशी यांनी सांगितल्या लग्नानंतरच्या आठवणी
पल्लवी लग्नाबद्दल म्हणाल्या, “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमची ओळख झाली, तेव्हाच आमची मैत्रीसुद्धा झाली. नंतर आम्ही एकत्र एक प्रॉजेक्ट करायला सुरुवात केलेली. मग कालांतराने लग्न झालं. लग्न व्हायच्या १ वर्ष आधी मला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रॉजेक्टसाठी विचारणा व्हायला लागली. आमचं लग्न झालं तेव्हा मी ५-६ मालिकांमध्ये काम करत होते. महिन्यातून जवळपास २८-२९ दिवस शूटिंग असायचं. तेव्हा मी सगळ्या दिग्दर्शकांना माझं नवीन लग्न झालं आहे, मला एक तास उशिरा बोलवा आणि एक तास लवकर सोडा असं म्हणायचे. मी रात्री घरी पोहोचायचे मग आम्ही रात्री १२ १२:३० वाजेपर्यंत गप्पा मारत बसायचो. “
पल्लवी पुढे म्हणाल्या, “नंतर मुलीचा जन्म झाला. त्यावेळेला मी ;अल्पविराम; नावाची मालिका करायचे. मला जेव्हा यासाठी विचारणा झाली तेव्हा मी म्हटलं की, माझ्या लग्नाला दीड वर्ष झाली आहेत आणि आम्ही आता बाळाचा विचार करत आहोत. तेव्हा मला सांगण्यात आलं की, नायिका गरोदर असते त्यामुळे तुमचं असं काही ठरलं तर मला सांग, मग आपण त्या पद्धतीने कथानक पुढे नेऊया.”
पल्लवी जोशी यांनी मुलांच्या जन्माबद्दल पुढे सांगितलं की, “मुलगा झाला तेव्हा मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला, कारण मला असं वाटलेलं की आयुष्यात सगळ्य गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, तरंच ते आपण संपन्न आयुष्य म्हणतो, त्यामुळे मुलांना सोडून कामावर जाण्यापेक्षा मी काही काळ ब्रेक घेतला. परंतु, तेव्हा विवेक मला असं नको करू, तू काम केलं पाहिजे असं म्हणालेला. घर, मुलं हे सगळं एकत्र सांभाळता यावं म्हणून मी निर्मिती संस्था सुरू केली, जेणेकरून माझ्या कामाच्या वेळा मला ठरवता येतील.”