परेश रावल यांनी दुखापत बरी व्हावी, यासाठी शिवांभू (स्वतःची लघवी) प्यायल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान परेश रावल यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ती बरी व्हावी, यासाठी त्यांनी उपचार न घेता ते शिवांभू प्यायले होते. यानंतर त्यांना खूप ट्रोल केलं गेलं होतं. आता त्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
परेश रावल यांनी सांगितलेला प्रसंग
‘घातक’ चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीन करताना परेश रावल जखमी झाले होते. परेश रावल म्हणालेले, “मी नानावटी रुग्णालयात असताना वीरू देवगण (अजय देवगणचे वडील) मला भेटायला आले होते. मी तिथे असल्याचं समजताच ते माझ्याकडे आले आणि मला विचारलं की काय झालंय? मी त्यांना माझ्या पायाच्या दुखापतीबद्दल सांगितलं. त्यांनी मला सकाळी उठून लघवी प्यायला सांगितलं. सर्व फायटर्स असं करतात. असं केल्याने तुम्हाला कधीही कोणतीही समस्या होणार नाही, फक्त सकाळी उठून लघवी प्या. त्यांनी मला दारू, मटण किंवा तंबाखूचे सेवन करू नका, असं सांगितलं. नियमित सकस आहार घ्या आणि सकाळी लघवी प्या,” असा सल्ला दिला.
“मी १५ दिवस लघवी प्यायलो आणि जेव्हा एक्स-रे रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टर आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांना एक्स-रेमध्ये एक पांढरी लायनिंग दिसली, ज्यावरून दुखापत बरी झाल्याचं स्पष्ट झालं. अशा जखमा बऱ्या व्हायला दोन ते अडीच महिने लागतात, पण मी १५ दिवसांत बरा झालो. डॉक्टरांनाही हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला होता,” असं परेश रावल म्हणाले होते.
परेश रावल यांनी ट्रोलर्सना दिलं उत्तर
बॉलीवूड हंगामाशी बोलताना परेश रावल म्हणाले, “मी त्यांना शिवांभू (लघवी) प्यायला दिले नाही, ही त्यांची अडचण आहे का? त्यांना असं वाटतंय का की हा एकटाच प्यायला आणि आम्हाला दिली नाही? खरं तर ही माझ्या आयुष्यातील एक घटना आहे जी ४० वर्षांपूर्वी घडली. मी ती सांगितली. त्यात काय झालं? लोकांना लहान गोष्टी उगाच वाढवून मोठ्या करायला आवडतं. त्यांना हे करायला आवडत असेल तर करू द्या.”
परेश रावल म्हणाले की अनेकांनी अशा दुखापतीतून सावरण्यासाठी स्वतःची लघवी प्यायली आहे. पण आता त्याबद्दल बोलवून ही गोष्ट उगाच वाढवायची नाही.
दरम्यान, परेश रावल यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते ‘फिर हेरा फेरी ३’मध्ये झळकणार आहेत. तसेच नुकताच त्यांचा ‘निकिता रॉय’ चित्रपट रिलीज झाला. यात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. तसेच परेश रावल अक्षय कुमारबरोबर ‘भूत बंगला’ सिनेमातही काम करणार आहेत.