Paresh Rawal Rejects Drishyam 3 : परेश रावल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विनोदी, खलनायकाच्या तसेच सहाय्यक भूमिकाही साकारल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परेश रावल नेहमीच विविध गोष्टींवरील त्यांची मतं ठामपणे मांडत असतात.
परेश रावल सध्या त्यांच्या ‘थामा’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यापूर्वी ते ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटामुळे बरेच चर्चेत आले होते. त्यांनी आधी या चित्रपटात काम करण्यास नकार दिलेला, परंतु नंतर अभिनेत्याने या चित्रपटासाठी होकार दिला. सध्या ते आयुष्मान खुराना व रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ या चित्रटामुळे चर्चेत असून यामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकत आहेत.
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘दृष्यम ३’ चित्रपटात परेश रावल झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. ‘दृष्यम’चा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला. हा २०१३ साली आलेल्या दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘दृष्यम २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता ‘दृष्यम ३’ सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
परेश रावल यांची दृष्यम ३बद्दल प्रतिक्रिया
परेश रावल यांनी या चित्रपटासाठी त्यांना विचारणा झाल्याचं म्हटलं आहे. ‘बॉलीवूड हंगामाला’ दिलेल्या मुलाखतीत ते याबद्दल म्हणाले, “हो, मला चित्रपटाच्या मेकर्सने विचारलं, पण मला तो रोल माझ्यासाठी साजेसा वाटला नाही, मजा आली नाही.” परंतु, चित्रपटासाठी जरी नकार दिला असला तरी परेश यांनी या चित्रपटाच्या कथानकाचं कौतुक केलं आहे.
परेश रावल ‘दृष्यम ३’च्या स्क्रीप्टचं कौतुक करत म्हणाले, “स्क्रीप्ट खूप छान आहे, मला खूप आवडली; पण स्क्रीप्ट कितीही चांगली असली तरी तुमची त्यातील भूमिकासुद्धा तितकीच चांगली असावी लागते, नाहीतर मग मजा येत नाही.”
दरम्यान, सध्या परेश रावल आयुष्मान व रश्मिका यांच्या ‘थामा’मधून झळकत आहेत. यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केलं आहे. ‘थामा’ चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. यानंतर ते ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटातूनही महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत.
