Prakash Raj Defends Abir Gulaal movie : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील झालेल्या पहलगामवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आणि वाणी कपूरच्या आगामी ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला खूप विरोध झाला. सोशल मीडियावर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार अशी चर्चा होती, मात्र हल्ल्यानंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित केला जाऊ नये अशी मागणी केली गेली. अशातच आता दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत ‘अबीर गुलाल’ हा भारतात प्रदर्शित होऊ न देण्याबद्दल अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. चित्रपटांवरील बंदीबाबत बोलताना प्रकाश राज यांनी चित्रपट कोणत्याही विचारसरणीवर आधारित असला तरी त्यावर बंदी घालणे चुकीचे आहे आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एक मोठा धोका असल्याचं मत व्यक्त केलं.

‘अबीर गुलाल’ चित्रपटावरील बंदीच्या वादावर प्रकाश राज म्हणाले, “मी कोणत्याही चित्रपटावर बंदी घालण्याच्या विरोधात आहे, जरी तो प्रचारकी चित्रपट असला तरी. जर हा चित्रपट बालशोषण किंवा अश्लीलतेला प्रोत्साहन देत नसेल तर तो का थांबवायचा? जनतेला स्वतः निर्णय घेऊ द्या.” यापुढे त्यांनी “आजकाल कोणत्याही लहान लहान मुद्द्यांवरून लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत आणि हे वातावरण धोकादायक आहे” असंही म्हटलं.

पुढे प्रकाश यांनी ‘पद्मावत’ आणि ‘पठाण’ चित्रपटावेळी झालेल्या विरोधाबद्दलही मत व्यक्त केलं. ‘पद्मावत’ आणि ‘पठाण’च्या वेळी दीपिका पदुकोणला मिळालेल्या धमक्यांबद्दल त्यांनी म्हटलं की, “लोक म्हणत होते की, आम्ही तिचे नाक कापू. हे कसले नाटक आहे? फक्त कपडाच्या तुकड्यासाठी किंवा त्याच्या रंगासाठी? काही लोक भीतीचे वातावरण निर्माण करू इच्छितात.”

यानंतर त्यांनी असं म्हटलं की, “सेन्सॉरशिप आता राज्य पातळीवर नाही तर केंद्राकडून नियंत्रित केली जात आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हळूहळू नष्ट होत आहे. नवीन पिढीला काहीही बोलण्यापूर्वी किंवा त्यांचे मत मांडण्यापुर्वी स्वतःवर सेन्सॉरशिप करण्यास धमकावले जात आहे.” यापुढे त्यांनी ‘L2: Empuraan’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली असूनही, २००२ च्या गोध्रा दंगलींच्या चित्रणामुळे वाद झाला याबद्दल भाष्य केलं.

‘L2: Empuraan’च्या वादामुळे अभिनेते मोहनलाल यांना माफी मागावी लागली. शिवाय चित्रपटातील काही दृश्येही काढून टाकण्यात आली. यावेळी ‘काश्मीर फाइल्स’चा उल्लेख करताना प्रकाश राज म्हणाले की, “काही चित्रपट कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रदर्शित होतात, परंतु काहींना इतकी सहज संधी मिळत नाही. ही समस्या कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नाही, परंतु जेव्हा केंद्र सरकार त्यांना प्रोत्साहन देतं, तेव्हा ते अधिक धोकादायक बनतं.”