Ranbir Kapoor and Alia Bhatt’s New Bungalow :मुंबईतील सर्वांत महागडं घर कोणत्या सेलिब्रिटीचं आहे, असा प्रश्न विचारला, तर आपसूकच अनेक जण शाहरुख खानच्या ‘मन्नत’ आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या बंगल्यांची नावं घेत असत. अनेक वर्षांपासून हे बंगले मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणं म्हणून ओळखली जात आहेत. या बंगल्यांबाहेर चाहत्यांची आजही तुफान गर्दी होताना दिसते. या बंगल्यांना प्रसिद्धी किंवा लोकप्रियता मिळाली ती अर्थात या बंगल्यांत राहणाऱ्या सुपरस्टार्समुळे…

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचं बॉलीवूडमधील योगदान, त्यातून त्यांना मिळालेली लोकप्रियता, तसेच या दोन्ही अभिनेत्यांच्या समाजातल्या प्रभावामुळे त्यांचा देश-विदेशांत प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे आणि हाच चाहतावर्ग अनेकदा त्यांना भेटण्यासाठी तसेच त्यांचे बंगले पाहण्यासाठी गर्दी करताना दिसतो.

शाहरुख खानचं ‘मन्नत’ हे घर बांद्रा येथील बँडस्टँडवर आहे, तर ‘जलसा’ जुहूच्या मधोमध, एक आलिशान भागात आहे. पण आता या दोन्हींपैकी कोणतंही घर मुंबईतलं सध्याचं सर्वात महागडं घर राहिलेलं नाही. आता मुंबईतील सर्वात महागडं घर एका तरुण सेलिब्रिटी कपलच्या नावावर आहे. हे कपल म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट.

रणबीर-आलियाचं लवकरच त्यांच्या नव्या घरी राहायला जाणार आहेत. मागील काही वर्षांपासून रणबीर-आलिया यांचं हे आलिशान घर बनत आहे. अशातच आता त्यांचं हे घर पूर्ण झालं असून लवकरच रणबीर-आलिया लेक आणि रणबीरची आई नीतू कपूर यांच्याबरोबर राहायला तेथे जातील. हे घर वांद्रे येथे आहे आणि जिथं आधी राज कपूर यांचा प्रसिद्ध ‘कृष्णा राज’ बंगला होता, त्याच ठिकाणी हे त्यांचं नवं घर उभं केलं गेलं आहे.

बॉलीवूड लाईफच्या वृत्तानुसार, हे घर तयार करायला रणबीर कपूर आणि त्यांच्या कुटुंबाला सुमारे २५० कोटी रुपये इतका खर्च आला आहे. एकंदरीत रणबीर-आलिया यांच्या ‘कृष्णा राज’ बंगल्यानं शाहरुख खानच्या ‘मन्नत’ आणि अमिताभ यांच्या ‘जलसा’ला मागे टाकलं आहे

काही वृत्तांनुसार, अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याची किंमत सध्या सुमारे १२० कोटी इतकी आहे. एकेकाळी हेच घर मुंबईतील सर्वांत महागडं सेलिब्रिटी घर होतं. त्यानंतर शाहरुख खानच्या ‘मन्नत’नं महागड्या सेलिब्रिटी घरांमध्ये स्थान मिळवलं. त्याचं ‘मन्नत’ हे घर एक वारसा हक्काचं ठिकाण आहे आणि सुमारे १० वर्षांपूर्वी त्याची किंमत २०० कोटी असल्याचं सांगितलं जात होतं. पण, अलीकडे त्याची किंमत पुन्हा ठरवली गेलेली नाही. त्यामुळे नेमकी माहिती उपलब्ध नाही. म्हणूनच रणबीर-आलियाचं नवं घर सध्या मुंबईतलं सर्वांत महागडं सेलिब्रिटी घर ठरलं आहे.

रणबीर-आलियाचं घर जरी सध्या मुंबईतील सर्वांत महागडं घर असलं तरी भारतातलं सर्वांत महागडं सेलिब्रिटी घर म्हणजे – पतौडी पॅलेस. ज्याची किंमत सुमारे १२०० कोटी आहे. हे घर सैफ अली खान आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचं आहे. हे त्यांचं वडिलोपार्जित घर आहे. सैफ अली खानचं पतौडी हरियाणामध्ये आहे.