Actress recalls Ranbir Kapoor was eager to seek parenting tips: अभिनेता रणबीर कपूरने गेल्या काही वर्षांत विविध भूमिका साकारत बॉलीवूडमध्ये त्याचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकापेक्षा हिट चित्रपट आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका यांमुळे रणबीर कपूर सध्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो
रणबीर हा अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. आई नीतू कपूर, बहीण रिद्धीमा कपूर, पत्नी आलिया भट्ट यांच्या वक्तव्यांमुळे रणबीर अनेकदा चर्चेत असतो.या सगळ्यात अभिनेत्याची लेक राहा चाहत्यांचे वारंवार लक्ष वेधून घेते. दोन वर्षांची राहा तिच्या निरागसपणामुळे, तिच्या सौंदर्यांमुळे, तिच्या डोळ्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
रणबीर कपूरबद्दल अभिनेत्री इंदिरा कृष्णन काय म्हणाल्या?
अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांनी रणबीरचे राहावर किती प्रेम आहे, याबाबत वक्तव्य केले आहे. इंदिरा कृष्णन व रणबीर यांनी रामायण या चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. इंदिरा कृष्णन यांनी या चित्रपटाता कौशल्याची भूमिका साकारली आहे. त्यांनी नुकतीच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या रणबीरबाबत म्हणाल्या, “रणबीर माझा आवडता सह-कलाकार आहे. तो नम्र आहे. सेटवर मला आराम मिळावा यासाठी त्याचा प्रयत्न असायचा. त्याच्याबरोबर अनेक मुद्यांवर उत्तम चर्चा करता आली. त्याच्याइतका यशस्वी अभिनेता इतर कलाकारांशी इतक्या नम्रतेने वागताना मी पाहिले नाही.तो त्याच्या मुलीबद्दल माझ्याशी ज्या साधेपणा आणि प्रमाणिकपणे बोलला, ते माझ्याबरोबर राहिले आहे. “
रणबीर राहासाठी नेहमीच काहीतरी खास शोधत असे. तो मला माझ्या मुलाच्या बालपणीच्या पुस्तकांबद्दल वारंवार विचारत असे. दररोज तो मला आठवणीने विचारत असे की तुम्ही राहासाठी पुस्तके आणली का?”
पुढे इंदिरा कृष्णन यांनी त्यांचा मुलगा अनिरुद्ध आणि रणबीर यांच्यातही उत्तम बॉण्डिंग झाल्याचे म्हटले. दोघांनी रणबीरच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये वेळ घालवला, गप्पा मारल्या.शाळेच्या बोर्डाच्या परीक्षा, बालपणी त्याची दिनचर्या कशी असायची यावरदेखील चर्चा केली. मुलीला उत्तमपद्धतीने कसे वाढवायचे, याबद्दल रणबीर कायम विचारत असे.
इंदिरा यांनी सेटवरील किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, रणबीर एकेदिवशी लंगडत सेटवर आला. त्याला थोडी इजा झाली होती. मी त्याला विचारले की काय झाले? तो म्हणाला की इंदिराजी राहासाठी एक शर्यत होती. मी धावलो आणि पहिला आलो. हा रणबीर आहे. तो इतर कशाच्याही आधी एक वडील आहे. दुखापत झाली असूनही त्याने दिवसभर काम केले”, अशी आठवण इंदिरा कृष्णन यांनी सांगितली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रामायण चित्रपटातील पात्रांचा पहिला लूक समोर आला होता. त्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.