अभिनेत्री राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात राणीच्या खास लूकने लक्ष वेधून घेतलं. तिने पुरस्कार सोहळ्यात सुंदर साडी नेसली होती. तसेच लेक आदिराच्या नावाचा नेकलेस घातला होता. राणी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय नसल्याने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिची झलक दिसणं ही चाहत्यांसाठी पर्वणी होती.
राणी मुखर्जी कोणतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत नाही. त्यामागचं कारण तिने स्वतःच सांगितलं आहे. सोशल मीडिया न वापरण्याचं कारण राणीचा पती आदित्य चोप्रा आहे. राणीने यावेळी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही भाष्य केलं. “तू इन्स्टाग्रामवर आहेस का?” असा प्रश्न विचारल्यावर राणी म्हणाली, “नाही. मी सोशल मीडियावर नाही.”
सोशल मीडियावर का नाही राणी मुखर्जी?
राणी मुखर्जी सोशल मीडियावर नाही, त्यामागचं कारण तिला विचारण्यात आलं. “लोकांनी आपल्याला पाहावं, अशी माझ्या पतीची इच्छा नाही. आणि मला सोशल मीडियावर येऊन अडचणीत यायचं नाही. कारण पतीला फोटो पोस्ट केलेले आवडत नाही, जर मी फोटो पोस्ट केले नाही आणि चाहते विचारतील की माझ्या नवऱ्याचा फोटो कुठे आहे? तर ते मिस्टर इंडिया आहेत असं उत्तर मला द्यायचं नाही.”
राणी पापाराझींना फोन करून बोलावते का?
बरेच सेलिब्रिटी डिनरला जाताना किंवा एअरपोर्टवर पापाराझींना फोन करून बोलावतात. असाच प्रश्न राणीला विचारण्यात आला. “आदि आणि मी या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात आहोत,” असं तू पापाराझींना फोन करून सांगतेस का? असं विचारल्यावर राणी म्हणाली, “अरे देवा, अजिबात नाही. ही खरोखर खूप वैयक्तिक गोष्ट आहे. म्हणजे, मला खासगी गोष्टी अशा लोकांना सांगायला आवडत नाही.”
राणी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय नाही. तसेच ती फारसे चित्रपट करत नाही, त्यामुळे चाहत्यांना तिचे फोटो व व्हिडीओ फार पाहायला मिळत नाही. आता राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी तिची झलक चाहत्यांना मिळाली. राणी मुखर्जी बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात झळकली नाही. ती शेवटची २०२३ मध्ये आलेल्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात दिसली होती.