Ravi Dubey Praises Ranbir Kapoor : रवी दुबे हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक मालिका, रिॲलिटी शोमध्ये काम केलं आहे. यासह तो एक निर्माताही आहे. लवकरच रवी दुबे नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटातून झळकणार आहे.
रवी दुबे कुठल्या न कुठल्या कारणांनी सतत चर्चेत असतो. तो व त्याची पत्नी सरगुन मेहता यांची स्वत:ची निर्मिती संस्थादेखील आहे. अशातच दोघांनी नुकतीच रणवीर अल्हाबादियाला मुलाखत दिली आहे. यामध्ये रवीने ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर कपूरबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
रवी दुबेची रणबीर कपूरबद्दल प्रतिक्रिया
‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर श्रीरामांच्या तर रवी लक्ष्मणाच्या भूमिकेतून झळकणार आहे. रवी या मुलाखतीत आधी चित्रपटासाठी काम करण्याचा अनुभव सांगत म्हणाला, “या भूमिकेमुळे माझ्यामध्ये खूप बदल झाला. भूमिकेला न्याय देण्यासाठी मला माझ्यामध्ये खूप बदल करावा लागला. माझं दिवसाचं वेळापत्रक पूर्णपणे बदललं होतं. माझ्यासह इतर सगळ्या कलाकारांनीही एवढीच मेहनत घेतली आहे. रणबीर कपूरनेसुद्धा. त्याने या चित्रपटासाठी खूप त्याग केला आहे. आम्ही सगळ्यांनी चित्रपटात साकारत असलेल्या पात्रांसाठी आमच्याकडून शक्य तितकी मेहनत घेतली आहे.”
रणबीर व रवी यांच्याबरोबर चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार आहे. या दोघांबद्दल रवी पुढे म्हणाला, “रणबीरचा ऑरा खूप वेगळा आहे. तो शांत, संयमी, कामाशी एकनिष्ठ असा असतो, तो खूप चांगला आहे; त्यामुळेच अनेक जण त्याला भेटल्यानंतर त्याचं कौतुक करतात. तर दुसरीकडे यश खूप वेगळा आणि सगळ्यांबरोबर मैत्रीपूर्वक संबंध ठेवणारा आहे. खूप चांगला आणि खरा माणूस आहे तो. हे दोघेही खूप वेगळे आहेत, पण दोघेही खूप चांगले आहेत.”
‘रामायण’साठी रणबीर कपूर झाला शाकाहारी?
सप्टेंबर महिन्यात या वर्षी रणबीरने ‘रामायण’ चित्रपटासाठी स्वत:च्या काही गोष्टींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. माध्यमांच्या वृत्तानुसार तो सात्विक आहाराचं सेवन करत होता. व्यायाम, मेडिटेशन या गोष्टींमुळे शरीराला शिस्त लावून जेणेकरून पात्र साकारताना याचा उपयोग होईल यासाठी तो या गोष्टी करत असल्याचही म्हटलं गेलं. त्याने केवळ मद्यपानच सोडलेले नाही, तर तो आता मांस, मच्छी, मटण असं काहीही खात नसून शाकाहारी झाला आहे.
दरम्यान, ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर या चित्रपटाचा पुढचा भाग प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे, त्यामुळे प्रेक्षकही या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
