Renuka Shahane Hum Aapke Hain Koun : माधुरी दीक्षित आणि सलमान खानचा ९० च्या दशकातील ‘हम आपके है कौन’ हा आजही अनेकांचा आवडीचा सिनेमा आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला तरी अनेक चाहते तो आवर्जून बघतात. मात्र, इतका गाजेलला ‘हम आपके है कौन’ सिनेमा रेणुका शहाणेंच्या मुलांनी पाहिला नव्हता.
‘हम आपके है कौन’मध्ये माधुरी दीक्षित आणि सलमान खानसह रेणुका शहाणेंची मुख्य भूमिका आहे. या सिनेमातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांना आवडते. अशातच या सिनेमाबद्दल रेणुका शहाणे यांनी मुलांचा किस्सा सांगितला आहे. या सिनेमात रेणुका यांनी आदर्श सुनेची भूमिका साकारली आहे. मात्र, पुढे सिनेमात त्या जिन्यांवरून पाय घसरून पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो, असे दाखवले आहे.
रेणुका यांचा हा मृत्यूचा सीन पाहिल्यानंतर त्यांच्या मोठ्या मुलाचं मन दुखावलं होतं. त्यामुळे या सीनबद्दल त्यांच्या मुलानं अशी प्रतिक्रिया दिली होती की, ‘हा दिग्दर्शक मला भेटला, तर मी त्याला मारेन.’ अमुक तमुक या यूट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात स्वत: रेणुका यांनी हा मजेशीर किस्सा शेअर केला आहे.
त्याबद्दल रेणुका शहाणेंनी सांगितलं, “मुलांच्या शाळेत माझ्या मुलांचे मित्र त्यांना तुझी आई अभिनेत्री आहे, असं म्हणायचे. तर, माझी मुलं म्हणायचे की ‘नाही, माझी आई अभिनेत्री नाही. माझे बाबा अभिनेते आहेत. माझी आई आई आहे’. मी अभिनेत्री असल्याचं त्यांना खूप नंतर कळलं.”
पुढे ते म्हणाले, “माझी मुलं तेव्हा खूपच लहान होती. त्यामुळे तेव्हा त्यांना काय सांगणार की, मी एकेकाळची अगदी मोठी अभिनेत्री आहे वगैरे… नंतर एकदा माझ्या मुलांनी विचारलं की, तू ‘हम आपके है कौन’ नावाचा चित्रपट केला आहेस का? मी म्हटलं की, हो. मग त्यांना तो सिनेमा दाखवला, तर मला ते म्हणाले, ‘यात तू काहीतरी वेगळीच दिसतेस. आम्हाला बघायची इच्छा नाही.’ त्यामुळे मुलं लहान होती. तेव्हा मुलांनी ‘हम आपके है कौन’ सिनेमा पाहिलाच नाही.”
रेणुका शहाणे इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे रेणुका शहाणेंनी सांगितलं, “मग नंतर मुलं जरा मोठी झाली तेव्हा त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांना चिडवलं की, तुम्ही ‘हम आपके है कौन’ पाहिला नाहीये. तुम्हाला त्यातली गाणी माहीत नाहीत. मित्रांनी वेड्यात काढल्यामुळे मग मुलांनी तो सिनेमा पाहिला. तेव्हा माझा मोठा मुलगा म्हणाला की, या दिग्दर्शकाला मी भेटलो, तर मी त्याला मारेन. त्यांनी माझा मम्माला का मारलं?” दरम्यान, रेणुका शहाणेंनी हसत हसत हा किस्सा शेअर केला.