Saif Ali Khan on working with Kareena kapoor: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने १९९३ साली ‘परंपरा’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. यश चोप्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सैफ अली खान आतादेखील अनेकविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो.

सैफ अली खान अनेकदा त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. अभिनेत्याने १६ ऑक्टोबर २०१२ ला अभिनेत्री करीना कपूरबरोबर लग्नगाठ बांधली. त्याला तैमूर व जेह ही दोन मुले आहेत. आता सैफने एका मुलाखतीत कलाकारांनी पत्नी किंवा गर्लफ्रेंडबरोबर काम करण्याबाबत वक्तव्य केले होते.

“आम्ही ज्या चित्रपटात एकत्र…”

सैफ अली खानने पिंकविलाला मुलाखत दिली होती. या जुन्या मुलाखतीत अभिनेता म्हणालेला की, जेव्हा माझ्या चित्रपटांची चर्चा व्हायची, तेव्हा लोक मला म्हणायचे की तू खूप नशीबवान आहेस की तुला इतक्या संधी मिळाल्या. पण, असाही काळ आला की मला चांगल्या चित्रपटांसाठी विचारणा होत नव्हती. तसेच, मला प्रमुख भूमिकेसाठीदेखील कास्ट केले जात नव्हते. पण, जसा काळ पुढे सरकत गेला तसे मला जाणवले की जर चांगली स्पर्धा असेल आणि चांगले सहकलाकार असतील तर मी उत्तम काम करू शकतो.

कलाकारांनी त्यांच्या जोडीदाराबरोबर काम करण्याबाबत सैफ अली खान म्हणालेला, “पत्नी किंवा गर्लफ्रेंड यांच्याबरोबर काम करणे ही कायमच चांगली कल्पना असेलच असे नाही.”

करीनाबरोबर एकाच चित्रपटात काम करण्याबाबत अभिनेता म्हणालेला, “आम्ही ज्या चित्रपटात एकत्र काम करू तो प्रोजेक्ट खूप खास असेल. आम्ही पती पत्नी आहोत म्हणून आम्हाला एका चित्रपटात कास्ट केले जाऊ नये, तर आम्ही कलाकार आहोत म्हणून आमचा त्या भूमिकांसाठी विचार व्हावा. यासाठी दिग्दर्शकाची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती महत्त्वाची आहे. त्या भूमिका आमच्यासाठी आव्हानात्मक असायला हव्यात. करीना आणि मी दोघेही काम करतो, त्यामुळे मला वाटतं की आयुष्यातील आनंद, मनोरंजन टिकवून ठेवण्यासाठी इतर कलाकारांबरोबर काम करणे आणि आम्ही एकत्र चांगले आयुष्य घालवणे महत्त्वाचे आहे.”

सैफ अली खानने त्याची पहिली पत्नी अमृता सिंहबरोबर एकाही चित्रपटात काम केले नाही. तर त्याने करीनाबरोबर काही चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे. ‘एलओसी कारगील’, ‘ओमकारा’, ‘टशन’, ‘रोडसाइ़ड रोमियो’, ‘कुर्बान’ तसेच ‘एजंट विनोद’ या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. याशिवाय त्यांनी काही जाहिरातीतदेखील एकत्र काम केले आहे.

करीना लवकरच मेघना गुलजार यांच्या ‘दायरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुन्हेगारीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. याआधी ती ‘सिंघम अगेन’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसली होती; तर सैफ अली खान नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘ज्वेल थीफ: द हीस्ट बिगिन्स’मध्ये दिसला होता. लवकरच अभिनेता ‘हैवान’ चित्रपटात दिसणार आहे.