बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफचा टायगर ३ या चित्रपटाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचा अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळत आहे. ट्रेलरनंतर आता या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. अखेर या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा-‘रामायण’मधील हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलने आकारली मोठी रक्कम; ‘इतक्या’ कोटींचे घेतले मानधन

‘टायगर ३’च्या घोषणेपासूनच या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू झाली होती. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील पहिले गाणे ‘लेके प्रभू का नाम’ प्रदर्शित झाले. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली. आता या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ५ नोव्हेंबर २०२३ पासून ‘टायगर ३’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू होणार आहे.

‘टायगर ३’ हा ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान कतरिनाबरोबर इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट १० नोव्हेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर ३’ हिंदीबरोबर तमीळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.