Salman Khan Talks About School Day’s : अभिनेत्री काजोल व ट्विंकल खन्ना सध्या त्यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमुळे चर्चेत आहेत. या नव्या कोऱ्या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात सलमान खान व आमिर खानने हजेरी लावलेली. त्यावेळी दोघांनी एकमेकांबरोबरचे, तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.

सलमान खान व आमिर खान ही बॉलीवूडमधील दोन मोठी नावं आहेत. दोघांनी आजवर अनेक चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. एवढंच काय दोघे एकाच शाळेत शिकत होते. परंतु, तरी त्यांना एकमेकांबद्दल काही माहिती नव्हती. अशातच आता सलमान व आमिरने त्यांच्या शाळेतील काही आठवणी सांगितल्या आहेत. आज जरी हे दोघे बॉलीवूडचे सुपरस्टार असले तरी त्या काळी मात्र दोघांनी कठीण प्रसंगांना तोंड दिल्याची माहिती दिली आहे.

सलमान त्याच्या शाळेतील दिवसांतला एक प्रसंग सांगत म्हणाला, “आमिर व मी एकाच शाळेत होतो; पण आम्हाला याबद्दल माहिती नव्हती. कारण- मी तिथे फक्त चौथीपर्यंत होतो. त्यानंतर मला शाळेतून काढून टाकण्यात आलेलं.” सलमान खानला यामागचं कारण विचारल्यानंतर त्यानं सांगितलं, शाळेत असताना एक दिवस एका मित्राबरोबर धावत होता आणि चुकून त्याचा मित्र पडल्यानं त्याला दुखापत झाली. पण, त्यावेळी शाळेतील त्याच्या शिक्षिकेचा त्याच्यामुळे त्याच्या मित्राला लागलं, असा गैरसमज झाला.” त्याव्यतिरिक्त सलमान खानला शाळेतून काढून टाकण्यामागे अजून एक कारण असल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आहे.

“फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकलेलं” – सलमान खान

सलमान शाळेतील तो प्रसंग सांगत म्हणाला, “मला शाळेबाहेर उभं केल्यानंतर माझ्या वडिलांनी यामगचं कारण विचारलं होतं. तेव्हा माझ्या शिक्षिका म्हणाल्या की, मिस्टर खान यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. कारण- तुम्ही फी भरलेली नाही. त्यानंतर माझ्या वडिलांनी शाळेतील मुख्याध्यापकांबरोबर संवाद साधून जमेल तेवढे पैसे भरले. पण, त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तेच घडलं आणि मला शाळेतून काढून टाकण्यात आलं”.

आमिर खाननंही पुढे त्याच्याबरोबरही असंच काहीसं घडल्याचं सांगितलं आहे. तो याबद्दल म्हणाला, “मला आठवतं की, माझ्या आई-वडिलांनाही त्यावेळी शाळेची फी भरणं शक्य नव्हतं. त्यावेळी ज्यांची फी भरलेली नसायची, त्या मुलांची नावं सगळ्यांसमोर घेतली जायची आणि त्याबद्दल बोललं जायचं.”

‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार काही दिवासंपूर्वीच आमिरनं त्याच्या व सलमान खानच्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल सांगितलेलं की, तो सध्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी करीत आहे. जर सगळं नीट जुळून आलं, तर लवकरच त्यांच्या चाहत्यांना या दोघांना अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र पाहता येइल.