हिंदी चित्रपटसृष्टीत गँगवॉरवर बेतलेल्या चित्रपटांची कमी नाही. आजच्या काळात ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारख्या चित्रपटांतून गँगवॉरचं चित्रण अधिक वास्तववादी पद्धतीने आपल्या पाहायला मिळतं. पण या सगळ्याचा पाया रचला तो महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’ या चित्रपटाने. अंडरवर्ल्डचा वाढता हस्तक्षेप आणि एकूणच वाढणारी गुंडगिरी आणि यामध्ये परिस्थितीमुळे गुरफटला गेलेला तरुण ही कथा या चित्रपटाने मांडली आणि हिंदी चित्रपटसृष्टीचं समीकरणच बदललं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाने संजय दत्तचा रघू भाई आणि त्याचा ‘पच्चास तोला’ हा डायलॉग अजरामर झाला. अजूनही संजय दत्तपासून ही भूमिका वेगळी झालेली नाही. याचबरोबर या चित्रपटाने मराठी अभिनेता संजय नार्वेकर यांना ‘देड फुटीया’ही ओळख मिळवून दिली ती कायमची. संजय नार्वेकर एक उत्कृष्ट अभिनेते आहेत यात काहीच वाद नाही, पण आजही त्यांना कित्येक लोकं आजही ‘देड फुटीया’ म्हणूनच ओळखतात. याच ‘वास्तव’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा संजय नार्वेकर यांनी किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या सेटवर सांगितला होता.

आणखी वाचा : चित्रपटगृहापाठोपाठ ओटीटीवरही दाक्षिणात्य चित्रपटांची चलती; तेलुगू चित्रपट ‘बिंबिसार’ने रचला इतिहास

संजय नार्वेकर हे त्यावेळेस रुईया कॉलेजच्या नाक्यावर मित्रांबरोबर असायचे. तेव्हा महेश मांजरेकर यांनी त्यांच्या मड आयलंड येथील बंगल्यावर वास्तवमधील एका सीनसाठी बोलावून घेतलं. खरंतर ‘देड फुटीया’ हे पात्र संजय नार्वेकर यांनीच करावं हे महेश यांच्या डोक्यात अगदी पक्क होतं. याबद्दल बोलताना संजय नार्वेकर म्हणाले, “मी पहिला शॉट दिला, आणि तेव्हा तो शॉट बरोबर झालाय ना हे पाहायला लॅबमध्ये जावं लागायचं कारण ते फुटेज लॅबमध्येच डेवलप होऊन चेक करता यायचं. शॉट झाल्यानंतर संजय दत्त आणि महेश मांजरेकर ते चेक करायला लॅबमध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याच बंगल्यात शूटिंगसाठी आलो.”

संजय नार्वेकर त्यांच्या सवयीप्रमाणे तिथल्या एका पायरीवर बसून चहा पित होते. एवढ्यात संजय दत्त तिथे आला आणि त्याने संजय नार्वेकर यांना सांगितलं की, “काय कमाल केलं आहेस, खूपच उत्तम, मी याबद्दल महेशशी सुद्धा बोललो आहे.” असं म्हणून संजय दत्तने त्यांच्या मॅनेजरला बोलावलं आणि त्याला तंबी दिली की आजपासून संजय नार्वेकर यांना चहा आणि बसायला खुर्ची कायम मिळायला हवी. अशा रीतीने या दोघांची गट्टी जमली आणि मग चित्रपटातही त्यांनी एकमेकांना सांभाळून घेत अप्रतिम काम केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt took care of marathi actor sanjay narvekar on the sets of film vaastav avn