मराठी अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar) लवकरच ‘छावा'(Chhaava) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पोलिस लाईन’, ‘छत्रपती शासन’, ‘रेगे’, ‘मोरया’, ‘डार्लिंग्ज’, ‘भोसले’, ‘गडबड गोंधळ’, ‘बॉइज’, ‘झेंडा’, ‘फक्त लढ म्हणा’, अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्याने मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वीच छावा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्याची जी झलक होती, त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. अभिनेत्याने चित्रपटात रायाजी ही भूमिका साकारली आहे. आता संतोषने एका मुलाखतीत, जेव्हा विकीला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिले होते, त्यावेळी त्याच्या मनात काय भावना होत्या, यावर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या वेशात जो समोर…

संतोष जुवेकरने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने छावा चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला. जेव्हा विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात पाहिले होते त्यावेळी काय वाटले होते, यावर तो बोलला आहे. छावा चित्रपटाच्या सेटवर जाताना डोक्यात काय विचार असायचा? अशा आशयाचा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर बोलताना संतोष जुवेकरने म्हटले, “त्या मधल्या काळात मी संतोष जुवेकर नव्हतोच, मी पूर्णपणे रायाजी होतो. जेव्हा चित्रपटात विकी कौशलच्या कास्टिंगविषयी समजल्यानंतर मी सरांना म्हटलं होतं की करेक्ट कास्टिंग आहे. कारण त्याची उंची, त्याचं दिसणं यामुळे तो मराठाच वाटतो. तिथे जर दुसरा कोणी गोरागोमटा असता, तर तसा महाराजांसारखा वाटला नसता.

“शूटिंगच्या पहिल्या दिवशी विकी महाराजांच्या पेहरावात आला ना, त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं. अजूनही अंगावर काटा येतो. पहिले काही दिवस विकी बसला की म्हणायचा, बस. म्हटलं, तुम्ही ज्या वेशात आहात तिथे मी बसू शकत नाही, ते होऊ शकत नाही. मला असं वाटतं की मी मराठी आहे आणि मला ती जाण आहे. मला त्या गोष्टी माहित आहेत. मला तो आदर इतका आहे ना की त्या वेशात कोणीही असो. त्या वेशात जो समोर आहे, त्याच्यासमोर मी बसू शकत नाही. किंबहुना कोणीच बसू नये असं मला वाटतं. तर मान त्या गोष्टींचा आहे. विकीने मला मिठी मारत म्हटलेले की, तू खूप मनावर घेत आहेस. मी त्याला म्हटलो की, ते मनावर घेण्यासारखेच आहे. एवढी ताकद, एवढी तयारी होती.”

अभिनेत्याने पुढे असेही म्हटले की, पूर्ण टीमने खूप अभ्यास केला आहे. कपडे, लूक यावर काम केलं आहे. वजन वाढवलं. या चित्रपटाच्या शूटिंग आधी ट्रेनिंग केलं. घोडेसवारी शिकलो, असेही संतोष जुवेकरने सांगितले आहे.

दरम्यान, चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना व इतर कलाकारही संतोष जुवेकरबरोबर प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh juvekar on what was his reaction when he saw vicky kaushals chhatrapati sambhaji maharaj first look of chhaava during movie shooting nsp