बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत असलेला ‘सेल्फी’ हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. कॉमेडी ड्रामा असलेल्या अक्षय कुमारच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २०२३ या नववर्षातील खिलाडी कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही अक्षयच्या या चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला नसल्याचं चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसवरील आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवशी काही खास कामगिरी करता आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, ‘सेल्फी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ तीन कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘सेल्फी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचं चित्र आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

‘सेल्फी’ हा चित्रपट एकूण १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. ‘ड्रायव्हिंग लायसेन्स’ या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही करण्यात आलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करेल, अशी अपेक्षा होती. ‘सेल्फी’ चित्रपटात अक्षय कुमार व इमरान हाश्मीसह नुसरत भारुचा व डायना पेंटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

अक्षय कुमारचे एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. २०२२ मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेले ‘राम सेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’ व ‘सम्राट पृथ्वीराज’ हे चित्रपटही फ्लॉप ठरले होते. परंतु, या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selfiee box office collection first day akshay kumar emraan hashmi movie flop kak