शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘झिरो’ चित्रपट २१ डिसेंबर २०१८ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटाची टक्कर दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ’बरोबर झाली होती. त्या लढाईत किंग खान थोडा मागे पडला. पण, आता ४ वर्षांनी बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा बॉलीवूड विरुद्ध साऊथ असं युद्ध पाहायला मिळणार आहे. आता यात शाहरुख ‘झिरो’ ठरणार की ‘हिरो’? याचा उलगडा येत्या २१ डिसेंबरला होईल. २०१८ मध्ये किंग खानच्या हाती ‘झिरो’शिवाय काहीच नव्हतं. पण, आता २०२३ मध्ये त्याच्या मागे ‘पठाण’सह ‘जवान’चं पाठबळ आहे अन् ४ वर्षांच्या ब्रेकमध्ये सिनेमावर केलेला अभ्यास!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी सर्वार्थाने सुपरहिट ठरलं. कारण, २०२१ व २०२२ या दोन वर्षांच्या काळात बॉलीवूडमध्ये पडलेला मोठा खड्डा किंग खानच्या आतापर्यंतच्या दोन चित्रपटांनी भरून काढला. एकीकडे, करोनानंतर बड्या कलाकारांची फौज असलेल्या ‘समशेरा’, ‘रामसेतू’, ‘सर्कस’ या चित्रपटांवर फ्लॉपची पाटी बसली असताना दुसरीकडे ‘पुष्पा’, ‘केजीएफ’, ‘आरआरआर’ या दाक्षिणात्य चित्रपटांसमोर भल्याभल्यांनी गुडघे टेकले होते. साऊथ बॉलीवूडला पूर्णपणे भारी पडणार इतक्यात ४ वर्षांच्या ब्रेकनंतर यात ‘पठाण’ची एन्ट्री झाली.

‘पठाण’ या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला अन् सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे ‘किंग इज बॅक!’ इंडियन एक्सप्रेसच्या चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांच्यामते ‘पठाण’ यशस्वी होण्यामागे काही कारणं आहेत. चित्रपटाचं स्पाय युनिव्हर्सशी संबंधित कथानक, सुंदर अशी शूटिंग लोकेशन्स, दीपिका पदुकोणचा दमदार अंदाज, डान्स-गाणी याच प्रमाणे शाहरुख खानच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, ४ वर्षांचा ब्रेक यामुळे त्याच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा झाली. त्याच्या लेकाचं म्हणजेच आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात झालेली अटक त्याचा प्रेक्षकांनी ‘जवान’मधल्या ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ या संवादाशी जोडलेला संबंध यावरून अंदाज येतो की प्रेक्षकांना अन् त्याच्या चाहत्यांना नेमकं काय अपेक्षित होतं. मुळात, चार वर्ष शाहरुख कुठेही गेला नव्हता. गेल्या तीन दशकांपासून तो खलनायक ते नायक बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता त्याला प्रेक्षकांना कधी काय हवंय याची उत्तम जाण आहे. म्हणूनच सात वर्षांच्या मुलापासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकजण त्याच्या चित्रपटाशी कनेक्ट होतो.

गेल्या काही वर्षांत बॉयकॉट बॉलीवूडचा जोरदार ट्रेंड सुरू होता. त्यामुळे साहजिकच ‘पठाण’ची घोषणा झाल्यावर शाहरुखविरोधी पुन्हा एकदा सक्रिय झाले. पण, शाहरुखचं १ हजार कोटींचं पुनरागमन या सगळ्या किंग खान विरोधकांसाठी खूप मोठा धक्का होता. चित्रपटाचं कलेक्शन समोर आल्यावर अनेकांकडून हे वाजवी, फसवे आकडे असल्याचं बोलण्यात आलं परंतु, शेवटी या लढाईत एकदा नव्हे तर एकाच वर्षात दोनदा किंग खानने बाजी मारली.

‘जवान’ची घोषणा जून महिन्यात करण्यात आली होती. परंतु, काही कारणास्तव हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यादरम्यान अनेकांना ‘जवान’ची हवा कमी होईल, चित्रपटाला फटका बसेल असं वाटलं पण, शाहरुख, दिग्दर्शक अ‍ॅटली, नयनतारा आणि दीपिकाच्या पंधरा मिनिटांच्या दमदार कॅमिओपुढे कोणाचाच निभाव लागला नाही. संपूर्ण चित्रपटसृष्टीत सप्टेंबर महिन्यात फक्त एकच चर्चा होती ती शाहरुख खानच्या ‘जवान’ची. या चित्रपटाला सुद्धा बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींचा गल्ला जमावण्यात यश मिळालं. देशातील राजकीय व सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आल्याने हा चित्रपट प्रत्येकाला आपलासा वाटला. बॉलीवूड विरुद्ध साऊथ असा संघर्ष सुरू असताना अ‍ॅटलीला आपलंसं करून या ‘बाजीगर’ने संपूर्ण बाजीच पलटवून टाकली. ‘जवान’च्या लॉन्चसाठी चेन्नईत भव्यदिव्य सोहळा पार पडला अन् चित्रपटसृष्टीचा ‘बादशहा’ कोण हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

हेही वाचा : “वहिनी या जगात नव्हती…”, हार्दिक जोशीने सांगितली ‘जाऊ बाई गावात’ शो स्वीकारतानाची भावुक आठवण

इंडियन एक्सप्रेसच्या चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता याविषयी म्हणतात, सध्या संदीप रेड्डीचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर जोरदार गर्जना करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीरला एक यशाची शिडी जरूर मिळाली पण, रणबीर हा चित्रपट त्याच्या लेकीला अभिमानाने दाखवू शकणार नाही. शाहरुखच्या ‘पठाण’-‘जवान’ आणि रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ व्यतिरिक्त यावर्षी सनी देओलच्या ‘गदर २’ आणि रणबीरच्या ‘रॉकी और रानी’ची चर्चा झाली. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’च्या निमित्ताने करण जोहरला बऱ्याच काळानंतर एक सुपरहिट चित्रपट मिळाला. एकंदर बॉलीवूडला सुगीचे दिवस दाखवण्यात शाहरुख खानचा सर्वात मोठा वाटा आहे. आता हे वर्ष सरताना ‘डंकी’ शाहरुखसाठी १ हजार कोटींची विजयाची हॅटट्रिक करेल का? हे पाहणं गरजेचं आहे. कारण, ‘डंकी’च्या निमित्ताने शाहरुखने अनेक वर्षांपासून काम करण्याची इच्छा असलेल्या राजकुमार हिरानींशी हातमिळवणी केली आहे. तसेच चित्रपटाचं कथानक हे अवैध स्थलांतरावर आधारलेलं आहे. गंभीर विषय सहज-सोप्या पद्धतीने हाताळण्यात हिरानींचा हात कोणीच धरू शकणार नाही. त्यामुळे एसआरके चाहत्यांना ‘डंकी’कडून प्रचंड अपेक्षा आहेत.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ फेम सुकन्या मोनेंच्या ९० वर्षांच्या आईची आहे ‘ही’ खास इच्छा; किस्सा सांगत म्हणाल्या…

अखेर २०२३ हे वर्ष शाहरुख खानचं होतं हे कोणीही नाकारू शकणार नाही अन् त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. यात जर ‘डंकी’ची भर पडली तर यंदा शाहरुख ३००० हजार कोटींचा बादशहा होईल यात शंका नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan achieved the most success in bollywood in 2023 entdc sva 00