Shah Rukh Khan and Kajol Dance Video : बॉलीवूडमधील सर्वांत प्रसिद्ध जोडप्याने पुन्हा एकदा त्यांच्या चित्रपटातील गाण्यांवर डान्स करून स्टेजवर आपली जादू दाखवली. शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी ७० वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला, जिथे अनेक बॉलीवूड स्टार्स त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करताना दिसले.

यादरम्यान, शाहरुख खान व काजोल यांनी जबरदस्त डान्स केला. दोघांचा हा रोमँटिक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोकांना तो खूप आवडतो आहे.

‘सूरज हुआ मद्दम’ व ‘ये लडका है दीवाना’ या गाण्यांवर त्यांनी सुंदर डान्स केला. नेटकरी त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करीत आहेत. ते ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ व ‘कुछ कुछ होता है’मधील गाण्यांवर डान्स करताना दिसले. या व्हिडीओने त्यांच्या चाहत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. फिल्मफेअरने हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आणि तो शेअर होताच व्हायरल झाला.

व्हिडीओमध्ये, शाहरुख खान आणि काजोल काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. शाहरुखने काळ्या रंगाचा सूट घातला होता, तर काजोल एका काळ्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. १७ वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख खानने फिल्मफेअरचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्याच्याबरोबर करण जोहर, अक्षय कुमार व मनीष पॉलदेखील दिसले होते; तर शाहरुख खानला भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पुरस्कारदेखील देण्यात येणार आहे.

काजोल व शाहरुख खान ही बॉलीवूडमधील ९० च्या काळातील हिट जोडी म्हणून ओळखली जायची. त्यांनी एकत्र काम केलेले बहुतांश चित्रपट हिट ठरले. त्यामुळे त्या काळी ही जोडी प्रेक्षकांची आवडती होती; तर काहींना हे दोघे खऱ्या आयुष्यामध्ये एकमेकांचे जोडीदार आहेत, असेही वाटायचे. काजोल व शाहरुख एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत.

शाहरुख व काजोलला बॉलीवूडमधील सर्वांत हिट आणि लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडप्यांपैकी एक मानले जातात. त्यांनी शेवटचे २०१६ मध्ये ‘दिलवाले’ चित्रपटात एकत्र काम केले होते. शाहरुख आणि काजोल पहिल्यांदा १९९३ मध्ये ‘बाजीगर’मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर ‘करण अर्जुन’, ‘डीडीएलजे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ व ‘दिलवाले’मध्ये दिसले. ९० च्या दशकातील त्यांचे सर्व चित्रपट ऑल-टाइम ब्लॉकबस्टर होते.