Shah Rukh Khan Diwali Photo : दिवाळीच्या सणात सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. या सणात पाहुण्यांची वर्दळ, गोडाधोडाचं जेवण, दिव्यांची आरास आणि सगळीकडे आनंदच आनंद असतो. सामान्यांपासून कलाविश्वातल्या कलाकारांच्या घरी दिवाळीच्या सणात जंगी सेलिब्रेशन केलं जातं. दिवाळीनिमित्त अनेक बॉलीवूड कलाकारांकडे मोठ्या पार्ट्या आणि मोठं सेलिब्रेशन होतं. मात्र, अनेक कलाकारांनी यंदा दिवाळीनिमित्त आपल्या प्रियजनांसह दिवाळीचं सेलिब्रेशन केलं.
सोमवारी (२० ऑक्टोबर) देशभरात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक सेलिब्रिटींनी आपापल्या पद्धतीनं दिवाळी साजरी केली आणि याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खाननं नव्या घरातील दिवाळी सेलिब्रेशनचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यंदा शाहरुख खाननं साधेपणाने साजरी केली दिवाळी
शाहरुख खाननं यंदा फारसा गाजावाजा न करता, अत्यंत साधेपणानं दिवाळी साजरी केली. अभिनेत्यानं सोशल मीडिया अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनची एक खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. तसेच त्यानं चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छाही दिल्या आहेत. शाहरुखचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
शाहरुखनं एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्याची पत्नी गौरी खान पूजा करताना दिसत आहे. या फोटोत गौरी पाठमोरी बसली असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्यानं शेअर केलेल्या फोटोत देवी लक्ष्मीचा फोटो दिसत आहे. हा फोटो शेअर करीत शाहरुखनं लिहिलंय, “सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! देवी लक्ष्मी तुमचं आयुष्य समृद्ध आणि आनंदी करो. सर्वांच्या जीवनात प्रेम आणि शांती नांदो, हीच प्रार्थना.”
शाहरुख खाननं पोस्टद्वारे दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
‘मन्नत’च्या नूतनीकरणामुळे यंदाची दिवाळी साधेपणानं
शाहरुख खानचं ‘मन्नत’ हे घर म्हणजे बॉलीवूडमधील भव्य दिवाळी पार्टीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या ‘मन्नत’च्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे शाहरुखनं यंदा कोणतीही मोठी पार्टी न करता, कुटुंबाबरोबर साधेपणानं दिवाळी साजरी केली. दरम्यान, शाहरुखनं शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनीसुद्धा अभिनेत्याला दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर शाहरुख सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ सिनेमाच्या तयारीत आहे. या चित्रपटात त्याच्यासह सुहाना खान, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन व राघव जुयाल यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.