Shah Rukh Khan Mannat Bungalow : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या अभिनयाने, स्टाइलने जितका चर्चेत असतो तितकीच त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्याचीसुद्धा चर्चा होताना दिसते. शाहरुखचा मुंबईतील आलिशान ‘मन्नत’ बंगला हा त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी एखाद्या पर्यटनस्थळापेक्षा काही कमी नाही.
शाहरुखच्या या ‘मन्नत’ बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम सुरू होताच शाहरुखने नूतनीकरण योजनेत उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याबद्दल याचिका दाखल केली होती. पण, आता शाहरुखला याप्रकरणी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
संतोष दौंडकर यांनी असा दावा केला होता की, महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) ने ३ जानेवारी रोजी दिलेली मंजुरी चुकीची आहे. मात्र, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) ने ही याचिका फेटाळली आणि स्पष्ट केलं की, मन्नतचं नूतनीकरण CRZ-II क्षेत्रात येत असल्यामुळे ते कायदेशीर आहे.
NGT ची टीका आणि अंतिम निर्णय
NGT ने असे नमूद केले की, याचिकाकर्त्याच्या वकिलांकडे किनारपट्टी नियमन क्षेत्र, ना हरकत प्रमाणपत्र (CRZ NOC 2008) चा कोणताही पुरावा नव्हता आणि त्यांनी हे प्रकरण यापूर्वी का उचललं नाही, हेही स्पष्ट झालं नाही. त्यामुळे न्यायालयाने शाहरुख खानच्या बाजूने हा निर्णय दिला.
News 18 च्या वृत्तानुसार, मन्नतचं नूतनीकरण करताना त्यात सातवा आणि आठवा मजला नव्याने बांधला जाणार आहे. हे दोन्ही मजले ड्युप्लेक्स फ्लॅट असतील. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर मन्नत बंगल्यात दोन बेसमेंट, एक ग्राउंड फ्लोअरही असतील, त्यामुळे इमारतीची एकूण उंची ३७.५४ मीटर असेल.
या प्रकल्पाला ७ नोव्हेंबर २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून आधीच मंजुरी मिळालेली आहे. हा प्रकल्प DP 2034 नियमानुसार निवासी भागात (रेसिडेन्शियल झोन) येतो.
खान कुटुंब सध्या कुठे राहत आहे?
गौरी खानने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि ते पुढील एका वर्षात पूर्ण होईल. तोपर्यंत शाहरुख, गौरी, आर्यन, सुहाना आणि अबराम हे कुटुंब बांद्रा येथील पाली हिल परिसरात २४ लाख रुपये भाड्याने घेतलेल्या ड्युप्लेक्स अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत.