This Bollywood Actress Praises Shahrukh Khan : शाहरुख खानच्या ‘मोहब्बते’ चित्रपटातून अनेक नवीन चेहरे समोर आले, त्यामुळे त्या चित्रपटातील त्यांचं काम प्रेक्षकांना आवडावं यासाठी शाहरुखने ऑफस्क्रीन मार्गदर्शक म्हणून काम केलं होतं. चित्रपटातही त्याची भूमिका काहीशी अशीच आहे. अशातच याच चित्रपटातील अभिनेत्री प्रिती (Preeti Jhagiani) ने शाहरुखबद्दल काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.
प्रितीने नुकतीच ‘लल्लनटॉप सिनेमा’ला मुलाखत दिली. यामध्ये तिने ‘मोहब्बते’ चित्रपटात शाहरुख खानसह काम करतानाचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, “शाहरुख खान सेटवरील स्पॉट बॉयबरोबर गप्पा मारायचा, त्यांच्या आयुष्याविषयी विचारायचा आणि त्यांच्याबरोबर जमिनीवरही बसायचा. त्याच्यासाठी त्याच्या नावाची अशी कोणतीही खुर्ची नसायची.”
सहअभिनेत्रीने केलं शाहरुख खानचं कौतुक
अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, इतर कलाकार असं करत नाहीत आणि शाहरुख खान तिच्यासाठी आदर्श आहे. अभिनेत्याबद्दल ती म्हणाली, “त्याने आम्हाला कधीच तो सुपरस्टार आहे असं वाटू दिलं नाही, इतका तो आमच्याबरोबर मिळून मिसळून राहायचा. तो खूप छान आहे. सगळ्यांबरोबर हसून खेळून राहतो. तो जेव्हा आम्हाला काही सल्ले द्यायचा, तेव्हा इतक्या चांगल्या प्रकारे द्यायचा की आम्हाला तो सल्ला देत आहे असं वाटायचंच नाही.”
प्रिती शाहरुख खानबद्दल म्हणाली, चित्रपटातील ‘सोनी सोनी’ गाण्यादरम्यान तिला एक शॉट द्यायला जमत नव्हता, परंतु शाहरुख खानने दिलेल्या सल्ल्यानंतर तिने तो शॉट व्यवस्थित दिला. त्यादरम्यान तिला गाणं गात चित्रीकरण करायचं होतं, परंतु तिला ते जमत नव्हतं. तेव्हा शाहरुख खान म्हणाला, माझा आवाज भारदस्त आहे, त्यामुळे मी गाणार नाही पण तू मोठ्याने गा, कारण कॅमेरा सर्व रेकॉर्ड करतो. त्यामुळे तू मोठ्याने गायलीस तर तेसुद्धा कॅमेऱ्यामध्ये दिसणार.