Shehnaaz Gill admits she betrayed ex boyfriend: अभिनेत्री शहनाज गिल नुकतीच पंजाबी चित्रपट इक कुडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचेदेखील कौतुक होत आहे.
“नात्यात गोष्टी फक्त…”
अभिनेत्रीने नुकतीच एसएमटीव्ही या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, तिने कधी कोणाला धोका दिला आहे का? यावर अभिनेत्री म्हणाली, “हो, मी असे केले आहे. मी एका रिलेशनशिपमध्ये असे केले आहे; नाहीतर इतर कोणाला मी फसवले नाही किंवा धोका दिला नाही.”
ती पुढे म्हणाली, “मी असे केले, कारण आमच्यात गोष्टी जुळत नव्हत्या. जेव्हा तुम्ही कोणाकडून कशाचीतरी अपेक्षा करता, तेव्हा ते त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. मला त्या अपेक्षा होत्या. नात्यात गोष्टी फक्त मीच करत आहे हे मला पटत नव्हते. देणे आणि घेणे यावर मी विश्वास ठेवते, त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी घडल्या, त्यावेळी मी ते नाते संपवले. मी ते नाते संपवले, कारण तुम्ही खूप गुंतवणूक करू शकत नाही; कारण तसे करणे तुमचा वेळ वाया घालवण्यासारखे आहे.”
“एक स्त्री म्हणून…”
शहनाज म्हणाली, “एक स्त्री म्हणून प्रेमाच्या बदल्यात तुमच्यावरही प्रेम केले जावे अशी अपेक्षा असते. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू शकत नसेल तर मग नात्यात असण्याला काय अर्थ आहे.”
याच मुलाखतीत शहनाजला तिच्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले. त्यावर ती म्हणाली, “माझा जोडीदार स्वावलंबी, मोकळेपणाने व्यक्त होणारा आणि समजून घेणारा असा असावा. त्यांनी मला माझी स्पेस दिली पाहिजे. आम्हाला एकमेकांना एकमेकांचे काम दाखवता आले पाहिजे. एकमेकांचे कौतुक करता आले पाहिजे. आमच्या फोनशिवाय आम्ही एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. आम्ही एकत्र प्रवास केला पाहिजे”, या जोडीदाराकडून अपेक्षा असल्याचे अभिनेत्रीने सांगितले.
पुढे तिला विचारले की, ती तिच्या जोडीदाराबरोबर खर्च विभागून घेण्यावर विश्वास ठेवते का? यावर अभिनेत्री म्हणाली, “मी आतापर्यंत जितक्या रिलेशनशिपमध्ये होते, त्या सगळ्याच रिलेशनशिपमध्ये मी माझ्या जोडीदाराबरोबर खर्च विभागून घेत असे. जरी आम्ही सुट्ट्यांसाठी गेलो तरी आम्ही बिल अर्धे अर्धे देत असू. पण, काही पुरुषांना स्त्रियांनी पैसे देणे यातही अहंकार दुखावतो. त्यांना वाटते की त्यांच्याच पैशांनी सर्वकाही केले पाहिजे. मला आश्चर्य वाटते. स्त्रिया त्यांच्या खर्चाचे पैसे देऊ शकतात, यामुळे त्यांना असुरक्षित वाटते का?”
या मुलाखतीत शहनाजने पैसे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ती म्हणाली, “मला माहीत आहे माझ्याकडे मी सोडून आर्थिकदृष्ट्या कोणीही लक्ष देऊ शकत नाही. मला माहीत नाही की मी लग्न करेन की नाही. तर मला माझी, माझ्या भविष्याची, आरोग्याची काळजी आहे. मला माझ्या कुटुंबीयांचीदेखील काळजी घ्यायची आहे, त्यामुळे मी जोपर्यंत काम करू शकते तोपर्यंत मी काम करणार आहे.”
