Anand Gandhi reveals he directed Tumbbad: २०१८ साली ‘तुंबाड’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. उत्तम कथानक, कलाकारांचा सहज अभिनय असला तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
या चित्रपटाबद्दल बोलायचे तर महाराष्ट्रातील एका गावातील स्वातंत्र्यपूर्वी काळातील घटना ‘तुंबाड’ या चित्रपटामध्ये रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा ही संपूर्णपणे काल्पनिक आहे. तुंबाड या गावात राहणाऱ्या सदाशिव ,त्याचा मोठा भाऊ विनायक आणि विधवा आई यांच्या भोवती हे कथानक फिरताना दिसते. लेखक नारायण धारप यांच्या कथेवर आधारित ‘तुंबाड’ चित्रपट आहे.
आनंद गांधी नेमकं काय म्हणालेत?
आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे चित्रपटाचे निर्माते आनंद गांधी यांनी या चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी केल्याचे म्हटले जात होते. मात्र, आनंद गांधीनी नुकतीच ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केल्याचे म्हटले आहे.आनंद गांधी नेमकं काय म्हणालेत, हे जाणून घेऊयात.
“त्यामुळे त्यांनाच दिग्दर्शकाचे श्रेय दिले”
आनंद गांधींना हे विचारण्यात आले की ‘शिप ऑफ थीसियस’नंतर तुम्ही कोणताही चित्रपट का दिग्दर्शित केला नाही? कारण तुंबाडमध्ये तुम्ही क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केल्याचे पाहायला मिळाले होते. यावर आनंद गांधी म्हणाले की तुंबाडबद्दल मी एक मोठी गोष्ट स्पष्ट करू इच्छितो ती म्हणजे मी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये सर्वांना माहित आहे. या चित्रपटात मला क्रिएटिव्ह डायरेक्टर असे म्हटले आहे. कारण- तुंबाडच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मी घेण्यापूर्वी राही अनिल बर्वे यांनी दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
“मी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतल्यानंतर पूर्ण चित्रपट पुन्हा शूट केला. आधी त्यांनी जे शूटिंग केले होते, चित्रपटात घेतले नाही. मात्र, त्यांनी आधी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली, त्यामुळे त्यांनाच दिग्दर्शकाचे श्रेय दिले आणि मला क्रिएटिव्ह डायरेक्टर असे श्रेय दिले. असे टायटल याआधी अस्तित्वात नव्हते. पण, या चित्रपटावेळी ते केले. याचा करारामध्ये उल्लेख आहे. मात्र, पत्रकार परिषद किंवा इतर कार्यक्रमांवेळी याबद्दल बोलले गेले नाही. मीदेखील त्यावर फार बोलण्याचा कधी प्रयत्न केला नाही. चित्रपट बनवताना मला आलेल्या नकारात्मक अनुभवांबद्दल मी पत्रकार परिषदेत फार बोलत नाही.”
“मी नेहमीच चित्रपट कसा बनवला, चित्रपट बनवण्याचे माझे हेतू काय आहेत अशाच गोष्टींबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुम्ही स्पष्टपणे विचारल्यामुळे, हे स्पष्ट करणे आवश्यक होते. तुंबाड चित्रपटात मी एक लेखक आणि निर्माता म्हणून काम सुरुवात केली आणि राही दिग्दर्शित करणार होते पण शेवटी मी चित्रपट दिग्दर्शित केला. पण त्यानंतर मला संपूर्ण चित्रपट बनवावा लागला.
दरम्यान, ‘तुंबाड’ चित्रपटाला २०१८ मध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी २०२४ मध्ये हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे पाहायला मिळाले.