सिद्धार्थ जाधव नुकताच ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून झळकला होता. यामध्ये त्याने मारुती कदम ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेसाठी अनेकांनी त्याचं कौतुक केलं. सिद्धार्थ जाधवने आजवर प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत.
सिद्धार्थ लवकरच ‘मटका किंग’ या हिंदी वेब सीरिजमधून झळकणार आहे.

अशातच काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधवने एका मुलाखतीमध्ये त्याच्या या वेब सीरिजमधील भूमिकेच्या ऑडिशनमागचा किस्सा सांगितला होता. सिद्धार्थने अमोल परचुरेला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. तो म्हणाला, “मला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याबरोबर काम करायचं होतं. एक दिवस त्यांचा फोन आला की, पुण्याला येऊन फक्त एक ऑडिशन देऊन जा. मी इतक्या वर्षांमध्ये कधी ऑडिशन दिलं नव्हतं आणि मी ऑडिशनच्या भानगडीत पडायचो नाही. पण, यावेळी मी ऑडिशनसाठी गेलो. मला तेव्हा दरदरून घाम फुटला होता. त्यांनी मला एक टी शर्ट दिला होता, तो पूर्ण भिजला होता. नागराज मंजुळेंनी सांगितलं होतं की हा रोल सिद्धार्थ जाधवच करेल; पण आम्हाला त्याचं ऑडिशन बघायचं आहे. तेव्हा मी त्यांच्या शब्दाखातर तीन वेळा ऑडिशन दिलं. पण, नीट जमत नव्हतं म्हणून मी त्यांना सॉरीसुद्धा म्हणालो. ते म्हणाले काही हरकत नाही, होईल.”

सिद्धार्थ पुढे म्हणाला, “मला असं वाटतं की हे कलाकाराबरोबर झालं पाहिजे. मी करेन रे, होऊन जाईल फक्त असं बोलून नटाचं काही होत नाही.” नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ ही वेब सीरिज या वर्षी प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेतून झळकणार आहे; तर अभिनेता विजय वर्मा या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ जाधवबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षांमध्ये तो अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसला. ‘वेड’, ‘अफलातून’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’, ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटांमधून झळकला होता. आता लवकरच तो ‘मटका किंग’ या आगामी वेब सीरिजमधून झळकणार आहे.