‘कांटा लगा’ या गाण्यातून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे शुक्रवारी, २७ जून रोजी निधन झाले. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसलाआहे. तिच्या मृत्यूचे कारण नेमके काय? याचा तपास सुरू आहे. शेफालीच्या निधनाला तीन दिवस झाले आहेत, पण तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप आलेला नाही. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने किंवा रक्तदाब कमी झाल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

शेफालीच्या निधनाने तिचा पती पराग त्यागीला मोठा धक्का बसला. शेफालीच्या आई-वडिलांवरही लेकीच्या अचानक जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर तिचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत. तिचा पहिला पती हरमीत सिंगनेही पोस्ट करून दुःख व्यक्त केले होते. आता त्याने शेफालीबरोबर शेवटची भेट केव्हा झाली होती, ते सांगितलं.

पराग त्यागी हा शेफालीचा दुसरा पती होय. शेफाली जरीवालाचे पहिले लग्न संगीतकार भावाचीं जोडी ‘मीत ब्रदर्स’ मधील हरमीत सिंगशी झाले होते. दोघांनी २००५ मध्ये लग्न केलं आणि २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. शेफालीने हरमीतवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. आता हरमीत सिंगने शेफालीच्या निधनानंतर विकी लालवानीशी बोलताना त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. एकत्र असताना नातं चढ-उतारांनी भरलेलं होतं. पण, कालांतराने दोघेही सर्व गोष्टी विसरून पुढे गेले.

हरमीतने सांगितली शेफालीबरोबरच्या शेवटच्या भेटीची आठवण

हरमीत एका शोसाठी बांगलादेशला गेला होता, तेव्हाच तो शेफालीला भेटला होता. या गोष्टीला २-३ वर्ष झाले. हरमीत म्हणाला, “मला आठवतंय की मी दोन-तीन वर्षांपूर्वी एका शोसाठी बांगलादेशला गेलो होतो. सनी लिओनी आणि शेफालीही तिथे होत्या. आम्ही तिघेही एका खासगी विमानाने परत आलो होतो. शेफाली आणि मी एकमेकांच्या शेजारी बसलो होतो. तेव्हा आम्ही बऱ्याच विषयांवर बोललो होतो. तसेच नंतर मी तिला काही कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही भेटलो. तिथेही आमच्या खूप गप्पा झाल्या होत्या. आम्ही एकमेकांना आमच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.”

हरमीतने केलेली पोस्ट

“माझ्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक क्षणांपैकी एक. शेफालीच्या अचानक निधनाबद्दल ऐकून मी पूर्णपणे हादरलो आहे. मला विश्वास बसत नाहीये. आम्ही खूप वर्षांपूर्वी काही सुंदर वर्षे एकत्र घालवली होती. या आठवणी कायम माझ्या हृदयाच्या खूप जवळ राहतील. तिचे आई-वडील, तिचा पती पराग त्यागी आणि बहीण शिवानी यांच्याबरोबर माझ्या संवेदना आहेत,” असं हरमीतने शेफालीच्या निधनानंतर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.