Sitaare Zameen Par Box Office Collection Day 3: सध्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या बहुप्रतिक्षीत ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर टीका झालेला हा चित्रपट अखेर शुक्रवारी (२० जून २०२५ रोजी) रिलीज झाला. या चित्रपटाने तीन दिवसांत दमदार कमाई केली आहे.

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाला होता, त्यानंतर तो मोठ्या पडद्यापासून दूर होता. आता तीन वर्षांनंतर आमिर पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर परतला आहे. त्याने ‘सितारे जमीन पर’ सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं. ‘सितारे जमीन पर’ आमिर खानच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत किती कलेक्शन केले? ते जाणून घेऊयात.

आमिर खान व जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत असलेल्या ‘सितारे जमीन पर’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘सितारे जमीन पर’ने भारतात सर्व भाषांमध्ये पहिल्या दिवशी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी २०.२ कोटी रुपये कमावले.

‘सितारे जमीन पर’चे रविवारचे कलेक्शन

तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘सितारे जमीन पर’च्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ‘सितारे जमीन पर’ने २९.२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन ६० कोटी रुपये झाले आहे. ८० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या ‘सितारे जमीन पर’ ने तीन दिवसांत निम्म्यापेक्षा जास्त बजेट वसूल केले आहे.

‘सितारे जमीन पर’मधील कलाकार

आरएस प्रसन्ना दिग्दर्शित आणि आमिर खान प्रॉडक्शन निर्मित, ‘सितारे जमीन पर’मध्ये आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे १० नवोदित कलाकार आहेत.

‘तारे जमीन पर’चे ओपनिंग कलेक्शन

‘सितारे जमीन पर’ हा आमिर खानच्या २००७ साली आलेल्या हिट चित्रपट ‘तारे जमीन पर’ चा सिक्वेल आहे. ‘तारे जमीन पर’ने ‘सितारे जमीन पर’च्या तुलनेत २००७ मध्ये प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवशी २.६२ कोटी रुपये कमावले होते. तेव्हा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.