अभिनेता वीर पहारिया (Veer Pahariya) सध्या त्याच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या वीरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्याच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याची मावशी प्रणिती शिंदे लोकसभेच्या खासदार आहेत. वीर हा स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. पण वीरने आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा चालवण्याऐवजी अभिनयाचा मार्ग निवडला. त्याने हा निर्णय घेण्यामागचं कारणही सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वीरला बॉलीवूडमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करायचं आहे. “माझ्या कुटुंबाने खूप यश मिळवलं आहे. पण मला आयुष्यात खूप लवकरच एक गोष्ट समजली, ती म्हणजे मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मला माझी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. जेव्हाही मी कुठे जायचो, तेव्हा मला त्या लोकांनी माझ्या कुटुंबामुळे ओळखावं, असं मला वाटत नव्हतं. मी कोण आहे, काय करतो त्यावरून त्यांनी मला ओळखावं अशी माझी इच्छा होती,” असं वीर म्हणाला.

राजकीय कुटुंबाशी संबंधित असण्याचे तोटे

आपल्या बालपणाबद्दल वीर सांगतो की राजकीय कुटुंबाशी संबंधित असण्याचे काही तोटे आहेत, पण तरीही तो सामान्य आयुष्य जगू शकला. “जेव्हा मी पाच किंवा सहा वर्षांचा होतो, तेव्हा मला माहीत होतं की माझे आयुष्य खूप सुरक्षित आहे. काही कारणांनी आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकत नव्हतो, पण तरीही मी खूप सामान्य जीवन जगलो. मला फारसे मित्र नाहीत आणि जे आहेत, ते देशभरातील अतिशय सामान्य आणि साधे लोक आहेत,” असं वीरने नमूद केलं.

मित्रांमुळे देशाच्या संस्कृतीशी जोडला गेला वीर

वीर हरियाणातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेला, तेव्हा त्याची एका नव्या जगाची झलक पाहायला मिळाली. तिथे जे मित्र बनले, त्यांनी त्याला खूप गोष्टी शिकवल्या. “मला असं वाटतं की मी माझ्या मित्रांमुळे या देशाच्या संस्कृतीशी जोडला गेलोय, कारण ते सगळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत. मी मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये वाढलो नाही,” असं वीर म्हणाला. आधीपासूनच अभिनय करायचा होता, असंही त्याने नमूद केलं.

वीरने बॉलीवूड पदार्पण करण्यापूर्वी वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sky force actor veer pahariya reveals why he chose acting over grand father sushulkumar shinde political legacy hrc