Smita Patil Memories : स्मिता पाटील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी त्यांच्या अभिनयाद्वारे अनेकांच्या मनात घर केलं होतं म्हणूनच आजही अनेक जण त्यांचे चित्रपट तितक्याच आवडीनं बघतात आणि त्यांच्याबद्दल कौतुक करतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, स्मिता यांनी मृत्यूपूर्वी एक इच्छा व्यक्त केली होती.
स्मिता पाटील यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी नुकतीच ‘रील मिट्स रियल’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी स्मिता यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीत त्यांनी स्मिता यांनी त्यांच्याकडेच ही इच्छा व्यक्त केल्याचं सांगितलं.
स्मिता पाटील यांनी व्यक्त केलेली ‘ही’ इच्छा
स्मिता यांच्याबद्दल त्यांचे मेकअप आर्टिस्ट म्हणाले, “त्या मला म्हणायच्या की, माझ्या निधनानंतर मला सौभाग्यवतीसारखं तयार कर. त्यावेळी मी त्यांना असं बोलू नकोस म्हणत ओरडायचो. त्या त्यांच्या आईलासुद्धा हेच सांगायच्या तेव्हा त्या त्यांना खूप ओरडायच्या.” दीपक यांनी पुढे स्मिता यांचं निधन झालं तेव्हा रडत रडत ते त्यांचा मेकअप करीत होते याबद्दल सांगितलं आहे.
स्मिता यांच्या निधनाबद्दल दीपक म्हणाले, “स्मिता यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या बहिणीला शिकागोवरून भारतात यायला दोन दिवस गेले. त्यावेळी स्मिता यांचा मृतदेह बर्फात ठेवण्यात आलेला.” दीपक सावंत पुढे म्हणाले, “स्मिता यांच्या अंत्ययात्रेआधी अमिताभ बच्चन आणि इतर कलाकार मंडळी तिथे उपस्थित असताना त्यांच्या आईनं मला मेकअप किट दिला आणि सांगितलं की, तिची इच्छा होती की, तिच्या निधनानंतर तिला सौभाग्यवतीसारखं तयार व्हायचं होतं. तेव्हा मी ते ऐकून रडायला लागलो. स्मिता यांचा मेकअप करताना माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते. मी त्यांचा शेवटचा मेकअप केला आणि तेव्हा त्या खूप सुंदर दिसत होत्या.”
‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार राज बबर स्मिता यांच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांचं नंदिराबरोबर आधीच लग्न झालेलं. पुढे स्मिता यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर राज व स्मिता यांच्या मुलाचा प्रतीकचा जन्म झाला. २८ नोव्हेंबर १९८६ रोजी त्याचा जन्म झाला आणि १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता यांचं निधन झालं. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. स्मिता यांच्या निधनानंतर राज बबर पुन्हा त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर राहू लागले.
‘रेडिफ.कॉम’शी संवाद साधताना राज बबर स्मिता यांच्याबद्दल म्हणालेले, “घरापासून रुग्णालयात जाईपर्यंत ती वारंवार माझी माफी मागत होती. मी तिला सांगत होतो की, सगळं काही ठीक होईल. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत तेव्हा अश्रू आले. तिला काय सांगायचं होतं मला कळत होतं. तासाभरानंतर डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की, ती कोमामध्ये गेली आहे. आम्ही दोघे एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलो होतो. तुम्ही कितीही म्हणालात की, तुम्ही खंबीर आहात वगैरे तरी तुम्हाला तुमच्या माणसांची खूप आठवण येत असते. ती आणि तिच्या आठवणी शेवटपर्यंत माझ्याबरोबर असतील.”