Actor left India and become a CEO: दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांचा धाकटा मुलगा व चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांचा भाऊ असलेल्या उदय चोप्राला अभिनेता म्हणून यश मिळाले नाही.

उदय चोप्राने ‘मोहब्बतें’ व ‘धूम’ या चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, अभिनेत्याच्या आयुष्यात एक टप्पा असा आला की, त्याने विचारपूर्वक अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

उदयने ९० च्या दशकात सहायक दिग्दर्शक म्हणून मनोरंजन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्याने त्याचे वडील यश यांना ‘लम्हे’, ‘डर’ व ‘दिल तो पागल है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शनात मदत केली. तसेच भाऊ आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.

आदित्य चोप्राच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून सुपरस्टार शाहरुख खान, अमिताभ बच्चन व ऐश्वर्या राय यांच्याबरोबर त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट खूप गाजला. त्यानंतर तो ‘धूम’ या यशस्वी बॉलीवूड फ्रँचायजीचा भाग बनला. ‘धूम’मध्ये त्याने ‘जय’ हे पात्र साकारले होते.

मात्र, उदय चोप्राला अभिनय क्षेत्रात पुरेसे यश मिळाले नाही. प्रेक्षकांनी त्याच्यावर टीका केली. नील ‘एन’ निक्की, प्यार इम्पॉसिबल व मेरे यार की शादी है अशा चित्रपटांतील त्याच्या अभिनयाचा प्रेक्षकांवर फारसा प्रभाव पडला नाही.

“त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला…”

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सच्या ‘द रोमँटिक्स’ या डॉक्युमेंट्रीमध्ये आदित्य चोप्रा यांनी घराणेशाहीच्या वादावर वक्तव्य केले. तो म्हणाला होता, “ज्यांच्याकडे विशेषाधिकार असतात किंवा ज्यांना सोई-सुविधा असतात, अभिनयाची पार्श्वभूमी असते, त्या घरातील प्रत्येक जण यशस्वी होतो, असे नाही. लोक अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ- माझे स्वतःचे कुटुंब घ्या. माझा भाऊ उदय एक अभिनेता आहे; परंतु त्याची कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही. तो एका मोठ्या चित्रपट निर्मात्याचा मुलगा आहे आणि भाऊ आहे.

पुढे आदित्य चोप्रा असेही म्हणाले होते की, वायआरएफ कंपनी असंख्य नवीन कलाकारांना लाँच करण्यासाठी ओळखली जाते. पण, त्या कंपनीतूनही आम्ही त्याला मोठा अभिनेता बनवू शकलो नाही. याचे कारण म्हणजे शेवटी निर्णय प्रेक्षकांचा असतो. पडद्यावर त्यांना कोणाला बघायचे आहे, हे ते ठरवतात. त्यांच्यासाठी दुसरा कोणीही हा निर्णय घेऊ शकत नाही.

या डॉक्युमेंट्रीमध्ये उदय चोप्राने लोक जेव्हा त्याच्यावर टीका करू लागले, तेव्हा त्याच्यावर काय परिणाम झाला, यावर वक्तव्य केले. तो म्हणाला की जेव्हा धूम हा चित्रपट आला, तेव्हा मी मुख्य प्रवाहातील अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्याची प्रयत्न करत होतो. जेव्हा मी अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा मी भोळा होतो. मला वाटले होते की, सर्वांना मी आवडेल; पण लोकांना मी आवडलो नाही. त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला.

उदयने मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि २०११ मध्ये यूसीएलएमधील एका प्रोडक्शन वर्क शॉपसाठी तो लॉस एंजेलिसला गेला. २०१४ मध्ये त्याने ग्रेस ऑफ मोनाको आणि द लॉन्जेस्ट वीक या दोन हॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली.यशराज फिल्म्सच्या हॉलिवूड प्रॉडक्शन हाऊस वायआरएफ एंटरटेनमेंटचा हा पहिला प्रकल्प होता. याबरोबरच, उदयने यशराज त्यांच्या वा द रोमँटिक्स या डॉक्युमेंटरीची निर्मातीदेखील केली होती.

उदयच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, २००५ मध्ये नील ‘एन’ निक्की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो अभिनेत्री तनिषा मुखर्जीला डेट करत होता. मात्र, दोन वर्षांनी ते वेगळे झाले. त्यानंतर २०१३ मध्ये तो अभिनेत्री नर्गिस फाखरीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांच्या लग्नाच्या अनेक अफवाही पसरल्या. परंतु, २०१७ च्या अखेरीस त्यांचे ब्रेकअप झाले.

सध्या उदय यशराज फिल्म्सच्या हॉलीवूड प्रॉडक्शन हाऊस वायआरएफ एंटरटेन्मेंटचा सीईओ आहे. तो त्यांचे व्यवसायदेखील सांभाळतो, ज्यामध्ये त्यांची कॉमिक कंपनी योमिक्स, तसेच तंत्रज्ञान आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणूक यांचा समावेश आहे.