Sunjay Kapur Net Worth: अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती बिझनेसमन संजय कपूरचे गुरुवारी (१२ जून रोजी) निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने उद्योगपती संजय कपूरची प्राणज्योत मालवली. पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना अचानक संजय खाली कोसळला, त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्याचे निधन झाले होते.
संजय कपूर हे उद्योगविश्वातील मोठं नाव होतं. तो ऑटो कंपोनंट बनवणाऱ्या सोना कॉमस्टारचा चेअरमन होता. ही कंपनी त्याचे दिवंगत वडील सुरिंदर कपूर यांनी १९९७ मध्ये स्थापन केली होती. सुरिंदर कपूर भारतातील ऑटो कंपोनंट उद्योगातील तज्ज्ञ होते. वडिलांचे निधन झाल्यावर संजयने २०१५ मध्ये मॅनेजिंग डायरेक्टरचा पदभार सांभाळला. त्यानंतर त्याने देश- परदेशात आपला व्यवसाय वाढवला. सध्या ‘सोना कॉमस्टार’चे भारत, चीन, मेक्सिको, सर्बिया आणि अमेरिकेत नऊ कारखाने आहेत. इथे इलेक्ट्रिक बाईक्ससाठी सुट्या भागांची निर्मिती केली जाते.
संजय कपूरकडे अमेरिकेचे नागरिकत्व
संजय कपूरकडे भारताचे नाही तर अमेरिकेचे नागरिकत्व होते. त्याने बकिंगहॅम युनिव्हर्सिटीतून बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची डिग्री घेतली होती. संजय कपूर एसीएमएचा माजी अध्यक्ष देखील होता. तसेच तो दून स्कूलचा विश्वस्त देखील होता. संजयचा व्यवसाय मॉडेल इलेक्ट्रिक वाहनं (ईव्ही), पॉवरट्रेन आणि गियर सिस्टमसारख्या प्रगत ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.
संजय कपूरची संपत्ती
फोर्ब्सवरील माहितीनुसार, संजयची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर म्हणजेच १०,३०० कोटी रुपये आहे. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्याचं नाव २७०३ व्या क्रमांकावर होतं. काही महिन्यांपूर्वी, त्याच्या पब्लिकली लिस्टेड कंपनीचे मूल्य ४० हजार कोटी रुपये होते. संजयची कंपनी जगातील आघाडीच्या १० कार कंपन्यांपैकी सात कंपन्यांसाठी ऑटोमोबाईल पार्ट्स बनवते.
करिश्मा कपूर पोटगीत मिळालेले ७० कोटी
अभिनेत्री करिश्मा कपूरची संपत्ती ८५ ते ९० कोटींदरम्यान आहे. संजय व करिश्माचा घटस्फोट झाला तेव्हा तिला मुलांच्या पालनपोषणासाठी पोटगी मिळाली होती. संजयने करिश्माला तब्बल ७० कोटी रुपये पोटगीत दिले होते.
© IE Online Media Services (P) Ltd