Abhishek Banerjee on Caste System : अभिनेता अभिषेक बॅनर्जीने ‘वेदा’ व ‘स्त्री २’ या दोन्ही चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘वेदा’ हा जॉन अब्राहम व शर्वरी वाघ यांचा चित्रपट आपल्या देशातील जात व्यवस्थेवर भाष्य करतो. यात जातीयवादाच्या बंधनातून मुक्त होऊ पाहणाऱ्या निरागस तरुणीची भूमिका शर्वरीने साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने आपल्या देशात जातीयवाद अजुनही प्रचलित आहे असं वक्तव्य केलं आहे.

“आपल्या समाजात जातीयवाद आहे, फक्त आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही इतकंच. आपल्यापैकी बरेच जण कॉस्मोपॉलिटन समाजात राहतात आणि कॅफे व रेस्टॉरंटमध्ये आपला वेळ घालवतात, पण ते हे विसरतात की अशी ठिकाणं आहेत जिथे अजुनही काही ठराविक लोकांना इतरांबरोबर बसण्याची परवानगी नाही. काही लोकांना एकाच टेबलावर बसण्याची, एकाच विहिरीतून पाणी पिण्याची किंवा देवाची पूजा करण्याची परवानगी नाही. हे सर्व हजारो वर्षांपासून प्रचलित असलेल्या रूढिवादी विचारांमधून आलंय. अजुनही जातीयवादाची गरज का आहे? वरिष्ठ जातीच्या लोकांना मला विचारायचं आहे की ते एखाद्याला जातीच्या आधारे जज करण्याइतपत श्रेष्ठ आहेत हे त्यांना कशामुळे वाटतं?” असं अभिषेक बॅनर्जी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

“प्रायव्हेट पार्ट दाखवला, दगड फेकले,” बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितले धक्कादायक अनुभव; म्हणाली, “शिक्षिकेने सांगितलं माझीच चूक…”

‘पाताल लोक’मधील त्याच्या पात्राचा संदर्भ देत अभिषेकने म्हटलं की दोन्ही पात्रांमध्ये जातीवाद ही गोष्ट समान आहे. “दोघेही जातीवर आधारित राजकारणातून आले आहेत,” असं अभिषेक म्हणाला. अभिषेक अभिनेता असण्याबरोबरच कास्टिंग डायरेक्टरदेखील आहे. त्याने ‘पाताल लोक,’ ‘आखरी सच’ यामध्ये नकारात्मक भूमिका केल्या होत्या.

अभिषेक बॅनर्जीचा ‘वेदा’ चित्रपटातील लूक (फोटो – इन्स्टाग्राम)

सलमान खान ‘या’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका साकारणार होता, पण…; अभिनेत्रीनेच सांगितलेला किस्सा

नकारात्मक भूमिका साकारण्याबद्दल अभिषेक म्हणाला…

नकारात्मक भूमिका करण्याकडे कल आहे का? असं विचारल्यावर अभिषेक म्हणाला, “‘पाताल लोक’ नंतर माझ्याकडे अशा भूमिकांचा पूर आला होता. काही खूप वाईट भूमिकांच्या ऑफरही आल्या. काही सायको कॅरेक्टर्सच्या भूमिका तर अत्यंत वाईट लिहिलेल्या होत्या. पण मी सगळ्यांना नकार दिला. मी ‘आखरी सच’ आणि ‘अपूर्वा’ हे दोन चित्रपट केले. ‘आखरी सच’ एका खऱ्या कथेवर आधारित पात्र होते आणि मला त्याबद्दल उत्सुकता होती. कारण तो माणूस वाईट व्यक्ती नव्हता, तो त्याच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी सर्व काही करत होता. फक्त नकारात्मक भूमिका करण्यात मला रस नाही, पण शेवटी सर्व काही स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकावर अवलंबून असतं.”

‘स्त्री २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने चार दिवसांत २४० कोटींची कमाई केली आहे, तर दुसरीकडे ‘वेदा’ला मात्र प्रेक्षक मिळत नाहीये. या चित्रपटाने १३.२५ कोटींचे कलेक्शन केले आहे.