बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा कायमच चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनय आणि स्टंटबाजीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केले. बॉलिवूडचा अण्णा म्हणून त्याला ओळखले जाते. सुनील शेट्टीने अॅक्शन हीरो म्हणूनच बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि पुढेही त्याची हीच ओळख कायम राहिली. सुनील शेट्टी हा त्याच्या वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. नुकतंच त्याने त्याचा जावई आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : इतर कुणी असो वा नसो, ‘अ‍ॅनिमल पार्क’मध्ये ‘हे’ पात्र नक्की असणार; खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

याचवर्षी जानेवारी महिन्यात सुनील शेट्टीची लेक व अभिनेत्री अथिया शेट्टी हीने क्रिकेटपटू केएल राहुलशी लग्नगाठ बांधली. तेव्हापासूनच दोघे चर्चेत आहेत. याबरोबरच केएल राहुल अन् सुनील शेट्टी यांचेही अत्यंत चांगले संबंध असल्याचं मध्यंतरी समोर आलं होतं. सासरे अन् जावई असं नातं असलं तरी केएल हा सुनील शेट्टीच्या मुलासारखाच आहे असंही मध्यंतरी अभिनेत्याने स्पष्ट केलं होतं. आता पुन्हा एकदा सुनील शेट्टीने केएल राहुलबद्दल वक्तव्य केलं आहे.

मध्यंतरी दुखापतीमुळे खेळावर झालेला परिणाम आणि इतर काही कारणांमुळे केएल राहुलला ट्रोल केलं गेलं. यावर्षीच्या विश्वचषकादरम्यानही त्याला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सततच होणारं ट्रोलिंग हे किती त्रासदायक आहे यावर नुकतंच सुनील शेट्टीने भाष्य केलं आहे. केएल राहुलला होणाऱ्या ट्रोलिंगमुळे आपल्यालाही प्रचंड त्रास होतो असं वक्तव्य सुनील शेट्टीने केलं आहे.

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टी म्हणाला, “लोकांचा त्याच्यावर असलेला विश्वास, निवड समितीचा त्याच्यावर असलेला विश्वास, त्याच्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास यातून सगळं स्पष्ट होत आहे. या ट्रोलिंगचा केएल आणि अथियाला होत असेल त्यापेक्षा कित्येक पटीने प्रचंड त्रास मलाही होतो” इतकंच नव्हे तर केएल राहुलला करावा लागणारा ट्रोलिंगचा सामना आणि त्यातून होणारा त्रास याची तुलना सुनील शेट्टीने आपल्या फिल्म सेटवरील पहिल्या दिवसाची केली आहे.

आजही ३० वर्षांनी जेव्हा सुनील शेट्टी हा रजनीकांतसमोर काम करायला उभा राहतो तेव्हा त्यालाही अस्वस्थ वाटतच असतं. त्यामुळे केएल राहुलला करावा लागणारा ट्रोलिंगचा सामना आणि त्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता ही स्वाभाविक आहे असंही तो या मुलाखतीदरम्यान म्हणाला. सुनील शेट्टी आता लवकरच ‘वेलकम टू जंगल’ आणि ‘हेरा फेरी ३’मध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suniel shetty breaks silence about kl rahul getting trolled for no reason avn