Suniel Shetty on Akshay Kumar: सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार हे बॉलीवूडमधील असे अभिनेते आहेत, ज्यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. विशेष बाब म्हणजे त्यांची जोडी हिट ठरली आहे. या दोन अभिनेत्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
सुनील शेट्टी काय म्हणाला?
आता सुनील शेट्टीने नुकतीच ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने अक्षय कुमारबरोबर कसे नाते आहे, याबद्दल वक्तव्य केले. सुनील शेट्टीला विचारण्यात आले की, आजही तो भावनिकरीत्या अक्षय कुमारबरोबर जोडला गेला आहे का? त्यावर तो म्हणाला, “मी अक्षयशी भावनिकदृष्ट्या खूप जोडला गेलो आहे. याचे कारण म्हणजे त्याला पाहिले की, मला माझ्या चुलतभावाची आठवण येते.”
“माझ्या भावाचे नाव उल्हास होते. अक्षय आणि त्याच्यामध्ये खूप साम्य आहे. अक्षयचे दिसणे, वागणे-बोलणे यांमुळे मला त्याला भेटल्यानंतर माझ्या भावाची आठवण येते. जेव्हा मी अक्षयला ‘वक्त हमारा है’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी भेटलो होतो. त्यावेळीच मी त्याला सांगितले होते की, तुझ्या स्वभाव, वागण्या-बोलण्यामुळे मला माझ्या भावाची आठवण होते.”
याआधी सुनील शेट्टीने ‘रेडिओ नशा’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याच्या चुलतभावाबाबत वक्तव्य केले होते. सुनील शेट्टी म्हणालेला, “मी आणि उल्हास आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो. मी मॉडेलिंगमध्ये आलो, त्यामध्ये त्याचे योगदान मोठे आहे. तो टप्पा गाठण्यासाठी त्याची मला खूप मदत झाली होती. मात्र, एका कार अपघातात त्याचे निधन झाले. त्याला गमावणे माझ्यासाठी मोठा धक्का होता.”
सुनील शेट्टी व अक्षय कुमार यांनी १९९० पासून एकत्र काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केली. त्यांचे विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. ‘मोहरा’ आणि ‘वक्त हमारा है’सारख्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटांमध्ये त्यांनी सुरुवातीला एकत्र काम केले. त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये धडकन या चित्रपटाचा समावेश होतो. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. २००० साली प्रदर्शित झालेल्या धडकन या चित्रपटात शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार व सुनील शेट्टी प्रमुख भूमिकांत दिसले होते. त्यांची प्रेमकहाणी, कथानक, तसेच चित्रपटांतील गाणी यांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याचे पाहायला मिळाले.
२००० च्या दशकातील ‘हेरा फेरी’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘फिर हेरा फेरी’, ‘दे दना दन’ या चित्रपटांतून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. आता ते लवकरत अहमद खान यांच्या वेलकम टू द जंगल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याबरोबरच हेरा फेरी ३ या चित्रपटातदेखील हे कलाकार एकत्र दिसणार आहेत.