Sushant Singh Rajput Father on Disha Salian Death Case: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे १४ जून २०२० रोजी निधन झाले. त्याच्या मृत्यूच्या एक आठवड्याआधी, त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनचे निधन झाले होते. दिशाने आत्महत्या केली होती की तिची हत्या झाली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात काही गंभीर दावे केले आहे. सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणावर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआयशी बोलताना सुशांत सिंह राजपूतचे वडील म्हणाले, “आधी दिशा सालियनच्या वडिलांनी म्हटलं होतं की, त्यांना काहीही माहिती नाही, ही आत्महत्या असू शकते. नंतर त्यांनी काय संशोधन केलं आणि कोणत्या आधारावर म्हणत आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे, हे मला माहिती नाही. पण त्यांनी जे काही केलं ते योग्य आहे. जे काही घडलं ते हत्या की आत्महत्या होती हे तरी किमान स्पष्ट होईल आणि सुशांतच्या प्रकरणात काय घडले हे देखील समोर येईल.”

पुढे केके सिंह म्हणाले की आता सरकार बदलले आहे, पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार यात खूप फरक आहे त्यामुळे अशी आशा आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप आशा आहे की त्यांच्या पातळीवर जे करतील ते बरोबर करतील.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे की सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांना न्याय मिळाला नाही. यावर ते म्हणाले, “हे सर्व आधी व्हायला हवं होतं, मात्र तेव्हा त्यांचे सरकार नव्हते. आता हे प्रकरण पुन्हा समोर आल्याने सरकार नक्कीच लक्ष देईल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, जेणेकरून ही आत्महत्या होती की हत्या हे कळू शकेल, अशी अपेक्षा आहे. तपास झाल्यास खरं काय ते समोर येईल.”

आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हणाले सुशांतचे वडील?

आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हायला हवी की नाही, कारण दिशा सालियनच्या वडिलांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. असा प्रश्न विचारल्यावर केके सिंह म्हणाले, “त्यांचे नाव संशयाने का घेतले जात आहे हे मला माहीत नाही. पण तपास झाल्यास नेमकं प्रकरण काय ते स्पष्ट होईल. यात कोणाचा सहभाग होता की नाही हे मी सांगू शकत नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput father kk singh reacts on disha salian death case hrc