The Bengal Files Teaser Marathi News : ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द ताश्कंद फाइल्स’नंतर विवेक अग्निहोत्रींचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधी या सिनेमाचं नाव ‘द दिल्ली फाइल्स’ असं होतं मात्र, या चित्रपटाचं नाव बदलून आता ‘द बंगाल फाइल्स : राईट टू लाईफ’ असं करण्यात आलं आहे. प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन या सिनेमाचं नाव बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.
“मी एक काश्मिरी पंडित आहे आणि म्हणून मी दाव्याने सांगू शकतो की, बंगालचं दुसरं काश्मीर होतंय…” या वेदनादायी संवादाने या सिनेमाच्या टीझरची सुरुवात होते अन् मग समोर येतं बंगालमधील भीतीदायक वास्तव… या टीझरमध्ये प्रभावशाली व्हिज्युअल्स आणि अंगावर काटा येईल अशी थरारक दृश्य पाहायला मिळतात.
‘द बंगाल फाइल्स’च्या जवळपास १ मिनिटं २६ सेकंदाच्या टीझरमध्ये “स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतरही आपण त्याच जातीय राजकारणाशी का लढत आहोत. आपण स्वतंत्र आहोत का? आणि जर आपण स्वतंत्र आहोत, तर आपण इतके असहाय्य का आहोत?” असे अनेक संवाद लक्ष वेधून घेतात.
टीझरमध्ये या सिनेमात झळकणाऱ्या कलाकारांची झलकही पाहायला मिळत आहे. दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, सिम्रत कौर, अनुपम खेर, एकलव्य सूद या कलाकारांसह मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसेल. “जर, काश्मीरने तुम्हाला रडवलं असेल, तर बंगाल तुम्हाला घाबरवेल” असं कॅप्शन देत हा टीझर निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट भारताच्या फाळणीपूर्वी काळात बंगालमध्ये घडलेल्या भीषण सांप्रदायिक दंगलींवर आधारित आहे.
‘द बंगाल फाइल्स’ या सिनेमाची कथा विवेक अग्निहोत्रींनी लिहिली असून याची निर्मिती पल्लवी जोशी आणि अभिषेक अग्रवाल करणार आहेत. हा बहुप्रतीक्षित सिनेमा येत्या ५ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘द बंगाल फाइल्स’ हा सिनेमा विवेक अग्निहोत्रींच्या ‘फाइल्स ट्रायोलॉजी’चा एक भाग आहे. यापूर्वी या अंतर्गत ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द ताश्कंद फाइल्स’ असे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.