Usha Nadkarni Lost Her Mind After Being Asked To Audition : उषा नाडकर्णी यांनी अनेक मालिका, चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मराठीसह हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर त्या त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या स्पष्टपणे त्यांचं मत मांडताना दिसतात.
उषा नाडकर्णी कुठल्याही गोष्टीबाबतची त्यांची प्रतिक्रिया नेहमी स्पष्टपणे व्यक्त करताना दिसतात. असंच एकदा त्यांना लोकप्रिय कलाकारांची स्टारकास्ट असलेल्या चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला सांगितलं गेलं होतं. परंतु, अभिनेत्री त्यावरून चित्रपटाच्या दिग्दर्शिकेवर रागावल्या होत्या. उषा यांना आलिया भट्ट व रणवीर सिंह यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटातील एक भूमिकेसाठी ऑडिशन देण्याबाबत सांगण्यात आलं होतं. परंतु, त्यांनी इतकी वर्षं काम करत असल्यानं ऑडिशन देण्यास नकार दिला होता.
उषा नाडकर्णी यांनी ऑडिशन मागितल्यामुळे ‘गली बॉय’साठी दिलेला नकार
‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत नुकतंच त्यांनी याबाबत सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “गली बॉय नावाचा एक चित्रपट होता आणि कोणीतरी मला ऑडिशनसाठी बोलावलं होतं. मी त्याला विचारलं की, तुझं वय किती आहे? तो म्हणाला की, २५. मी त्याला सांगितलं की, तुझ्या आईच्या जन्माच्या आधीपासून मी काम करत आहे. त्यामुळे ऑडिशन देण्यासारखी फालतू कामं मी करत नाही. मी त्याला विचारलं की, दिग्दर्शक कोण आहे आणि त्यानं मला नाव सांगितल्यानंतर मी म्हटलं की, श्रीमंत बापाची लेक आहे ना? माझं काम बघ आणि तिला सांग माझं नाव गूगल करायला, मग कळेल मी काय काय काम केलं आहे.”
उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या, “हे हल्लीचे सहायक दिग्दर्शक लहान मुलं असतात. स्वत:ला कोणीतरी खास असल्यासारखं समजतात; पण साधी दोन वाक्यंसुद्धा त्यांना जोडून बोलता येणार नाहीत. असंच एकदा अजून एका ऑडिशनदरम्यान घडलेलं. एकदा मला एका ऑडिशनसाठी बोलावण्यात आलेलं. मी तिथे गेले आणि पाहिलं, तर दोन मुलं खर्चीवर बसली होती. त्यांनी मला खुर्ची पाहिजे का, असं विचारण्याचीही तसदी घेतली नाही.”
“त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केले नाहीत. त्यांनी मला सांगितलं की, ज्या व्यक्तीला मला भेटायचं होतं, ती कामात व्यग्र आहे आणि माझ्या हातात एक स्क्रिप्ट दिली. मी ती स्क्रिप्ट फेकली आणि तिथून निघाले. त्यांच्यामुळे मला राग अनावर झालेला. आधी समोरची व्यक्ती कोण आहे ते बघा आणि मग त्याच्याकडे ऑडिशन मागा. मला कोणी गर्विष्ठ म्हटलं तरी चालेल; पण मी चुकीची नाहीये.”