Vijay Raaz submitted a blank exam paper in College: अभिनेता विजय राज जवळपास तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी २०१९ मध्ये ओटीटीवर काम सुरू केलं. मेड इन हेवन, शेरनी, मर्डर इन माहीम आणि शोटाइम या त्यांच्या गाजलेल्या वेब सीरिज. विजय सध्या अमेझॉन एमएक्स प्लेयरच्या जमनापार सीझन २ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या सीरिजच्या निमित्ताने त्यांनी स्क्रीनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कमी वयात पैसे कमवायला सुरुवात केली त्याबद्दल सांगितलं.
विजय राज कॉलेजमध्ये दोनदा नापास झाले होते. विजय दिल्लीतील डीएव्ही कॉलेजमध्ये शिकत होते. १९ व्या वर्षी त्यांना थिएटरबद्दल समजलं आणि अभिनय करायला सुरुवात केली होती. “मी अपघाताने या क्षेत्रात आलो; मला कधीच या क्षेत्रात यायचं नव्हतं. मी माझं आयुष्य जगत होतो. मी अकाउंटंट म्हणून नोकरी करत होतो आणि एका संध्याकाळच्या महाविद्यालयात शिकत होतो. अचानक, माझी भेट काही लोकांशी झाली जे थिएटर करत होते. तिथे मी पहिल्यांदाच थिएटर हा शब्द ऐकला. मी तेव्हा १९ वर्षांचा होतो आणि तिथूनच हे सर्व सुरू झालं,” असं ते म्हणाले.
सरकारी नोकरी करावी अशी वडिलांची अपेक्षा होती
“सुरुवातीला, माझ्या कुटुंबाला वाटले की मी व्यग्र आहे. मी काहीतरी करतोय, यातच ते खूश होते. पण जेव्हा त्यांना कळलं की मी हेच कायम करणार आहे, तेव्हा ते खूश नव्हते. माझ्या वडिलांची सरकारी नोकरी होती. त्याकाळी सरकारी नोकरीला खूप आदर होता. तुम्ही शिपाई असाल तरी तुमच्या मृत्यूपर्यंत सरकार काळजी घ्यायचं. तेव्हाच्या पिढीत तो विचार रुजला होता. त्यामुळे मीही सरकारी नोकरी करावी, अशी वडिलांना अपेक्षा होती,” असं विजय राज यांनी सांगितलं.
पेपरवर फक्त नाव लिहून परत आलो- विजय राज
आता यशस्वी असलेले विजय राज अभिनयाकडे वळल्यामुळे कॉलेजमध्ये नापास झाले होते. विजय म्हणाले, “मी बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात थिएटर करायला सुरुवात केली आणि नंतर माझा अभ्यासातील रस कमी झाला. शेवटच्या वर्षात, माझा अर्थशास्त्राचा पेपर होता आणि मी थिएटरच्या प्रेमात इतका हरवलो होतो की पेपर हातात आल्यावर मी एक शब्दही लिहू शकलो नाही. मला काहीच सुचत नव्हतं. मी तसाच बसून राहिले. शिक्षकांना मी पेपर परत द्यायला गेलो. त्यांनी मला किमान अर्धा तास बसावं लागेल, असं सांगितलं. त्या वेळेत मी पेपरवर फक्त स्वतःचं नाव टाूक शकलो. मला वाटलं शिक्षकांना माझ्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटेल, पण मी नापास झालो. मी पहिल्या दोन वर्षांत नापास झालो होतो, त्यामुळे त्या परीक्षा मी एकाच वेळी देत होतो.”
साडीच्या दुकानात काम केलं – विजय राज
विजय पुढे म्हणाले, “मी १८ वर्षांचा असताना पैसे कमवायला सुरुवात केली. मी एका चार्टर्ड अकाउंटंटकडे काम करत होतो, माझ्या वडिलांनी मला तिथे कामावर पाठवलं होतं. मी त्यांच्याकडून अकाउंटिंग शिकलो. पुढे तेच माझे प्रोफेशन झाले आणि नंतर मी अनेक ठिकाणी काम केले. माझी शेवटची नोकरी करोल बागमधील एका साडीच्या दुकानात होती. मी तिथे अर्धवेळ नोकरी करायचो. मी खूप विचित्र नोकऱ्या केल्या आहेत. आज लोक १७ वर्षांच्या मुलांना लहान मुलं समजतात. आमच्या काळात मी १५ वर्षांचा असताना काम करायला सुरुवात केली होती.”
विजय राज यांनी १९९९ मध्ये भोपाळ एक्सप्रेस या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी जंगल, मान्सून वेडिंग, रन, गंगूबाई काठियावाडी, गली बॉय, वेलकम अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. चंदू चॅम्पियन आणि भूल भुलैया ३ त्यांचे अलिकडचे ब्लॉकबस्टर चित्रपट होय.