Vijay Varma reveals battling depression: अभिनेता विजय वर्मा हा सिनेमा आणि विविध वेब सीरिज यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. विविध धाटणीच्या भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे.

अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल वक्तव्य केले आहे. अभिनेत्याने नुकतीच रिहा चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने खुलासा केला की त्याने नैराश्याचा देखील सामना केला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आमिर खानची लेक आयरा खानने त्याला मदत केली.

“ते कधी काय करतील याचा अंदाज लावणे…”

या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “मी लहान असताना, मला माझ्या वडिलांबद्दल आकर्षण वाटायचे. ते बिझनेससाठी दौऱ्यावर जायचे आणि परतताना भेटवस्तू घेऊन यायचे. त्यांचे व्यक्तीमत्व खूप वेगळे होते. त्यांना पटकन राग यायचा, तसेच ते कधी काय करतील याचा अंदाज लावणे कठीण व्हायचे. त्यामुळे अनेकदा मला त्यांच्या वागण्याचे आश्चर्य वाटायचे आणि त्याच वेळी धक्काही बसायचा. “

“पण माझ्या किशोरावस्थेत माझे त्यांच्यावरील प्रेम कमी झाले. त्यांचे माझ्यावर प्रेम होते. पण, त्यांना अशा गोष्टी माझ्याकडून हव्या होत्या, ज्या मला नको होत्या. माझे करिअर, माझे मित्र इतकेच नाही तर मी कसा वेळ घालवला पाहिजे, याबद्दलही त्यांनाच निर्णय घ्यायचे होते. याच गोष्टींमुळे आई आणि माझ्यातील जवळीकता वाढली. ती माझ्या आयुष्यात माझा भावनिक आधार बनली.”

अभिनेता पुढे म्हणाला की माझ्या वडिलांना वाटत होते की मी आमच्या कौटुंबिक व्यवसायातच माझे करिअर करावे. मला बिझनेस करणे आवडायचे. पण, मला माझ्या वडिलांचा सहवास आवडला नाही. मी किशोरावस्थेत असताना आमच्यात दुरावा निर्माण झाला. मी त्यांच्या गोष्टींना जितका नकार दिला, तितकाच त्यांना माझ्याबद्दल राग निर्माण झाला. मला माझा वेगळा मार्ग निवडायचा होता. त्यासाठी मी विविध कामे करायला सुरुवात केली. जी माझ्या वडिलांना आवडले नाही. त्यांना वाटायचे की नोकरच नोकरी करतात. आपण बिझनेस करतो.”

“त्यांना खोटे सांगितले की मला…”

अखेर रंगभूमीमुळे विजयच्या आयुष्यात एक नवी उमेद जागृत झाली. जेव्हा त्याच्या नाटकाबद्दल वर्तमानपत्रात छापून येऊ लागले, तेव्हा तो ते त्याच्या कुटुंबाला अभिमानाने दाखवत असत. मात्र, तरीही त्याच्या वडिलांना त्याचा अभिमान वाटला नाही. मात्र, जेव्हा त्याला एफटीआयआय(FTII) मध्ये प्रवेश मिळाला, तेव्हा त्याला घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली.

विजयने पुढे सांगितले की वडिलांना भेटण्यासाठी घाबरत असल्याने मी त्यांना न भेटताच घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. पण, माझी बहीण आणि आई रडत होती, त्यामुळे मी विचार बदलला. वडिलांना फोन केला आणि त्यांना खोटे सांगितले की मला शिष्यवृत्ती मिळाली आहे आणि एक वर्षाचा कोर्स आहे. त्यावर ते मला काहीतरी वाईट बोलले आणि सांगितले की मी परत येण्यापूर्वी तू निघून जा. म्हणून मी माझ्या बॅगा पॅक केल्या आणि निघून गेलो. मला त्रास नको होता. असे म्हणत अभिनेत्याने वडिलांबरोबर कसा दुरावा निर्माण होत गेला, याबद्दल सांगितले.

अभिनेत्याने कोर्स पूर्ण केल्यानंतरही काम मिळवणे सोपे नव्हते, असे सांगितले. तो म्हणाला, “मी जवळजवळ एक दशक काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होतो. गली बॉय चित्रपटापर्यंत मला चांगले काम मिळाले नाही.

“आयराने योग्य वेळी…”

पुढे नैराश्याबद्दल अभिनेता म्हणाला, “२०२० च्या लॉकडाऊनमध्ये मी एकटा होतो. मुंबईच्या अपार्टमेंटमध्ये मी एकटा राहत होतो. त्याला एक टेरेस होते. तिथून दिसणाऱ्या आकाशाने मला वाचवले. त्या काळात मला जाणवले की सतत काम शोधत होतो आणि यादरम्यान, मी माझ्या आयुष्यात खूप एकटा पडलो होतो.”

विजयने असेही सांगितले की याचदरम्यान तो नैराश्यात गेला. आमिर खानची लेक आयराने त्याच्यामध्ये नैराश्याची लक्षणे दिसत असल्याबद्दल त्याला पहिल्यांदा सांगितले होते.तिने मला मदत केली. पण, तरीही मी काम करू शकत नसे. मग मी थेरपी घेतली.

“मी अनेक गोष्टींबद्दल कधीच उघडपणे बोललो नाही. त्यामुळे, त्या गोष्टी माझ्यामध्ये साठल्या होत्या. मात्र, थेरपी आणि योगा या गोष्टींमुळे मी व्यक्त होऊ लागलो. सूर्य नमस्कार करताना मी कोसळायचो आणि तासंतास रडायचो. घर सोडल्याबद्दल माझ्या मनात अपराधीपणाची भावना होती. अजूनही आहे. मी माझे कुटुंब सोडले आणि एक दशक एकटा संघर्ष केला आणि कोणतेही यश मिळाले नाही. आज गोष्टी अर्थपूर्ण आहेत. पण, तेव्हा त्या नव्हत्या.”

अभिनेताआयराबद्दला म्हणाला, “मला आनंद आहे की आयराने योग्य वेळी मदत केली. तिने मला सांगितले की थेरपी वाईट नाही. त्यामुळे मी थेरपीकडे वळलो”, अशा प्रकारे अभिनेता नैराश्यातून कसा बाहेर आला, याबद्दल वक्तव्य केले.

दरम्यान, विजय वर्मी हक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.