vivek agnihotri reacts on nadav lapid apologies for the kashmir files remark in iffi 2022 | Loksatta

“…त्याला माफी म्हणता येणार नाही” नदाव लॅपिड यांच्या माफीनाम्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया

नदव लॅपिड यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हणत माफी मागितली होती. यावर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे

“…त्याला माफी म्हणता येणार नाही” नदाव लॅपिड यांच्या माफीनाम्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया
आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इस्रायली निर्माते आणि ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे मुख्य ज्युरी नदाव लॅपिड यांनी महोत्सवाच्या निरोप समारंभात केलेल्या भाषणात ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला ‘व्हल्गर’ (अश्लिल) आणि ‘प्रोपगंडा’ (प्रचारकी) असल्याचं म्हटल्यानं बराच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भारतातून नदाव लॅपिड यांच्यावर टीका करण्यात येत होती. तर, इस्त्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनी देखील लॅपिड यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत वादातून काढता पाय घेतला होता. त्यानंतर नदव लॅपिड यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं म्हणत माफी मागितली होती. यावर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सीएनएन न्यूज १८ शी बोलताना नदव लॅपिड यांनी म्हटलं, “द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझा उद्देश काश्मिरी पंडित समुदाय अथवा त्यांना झालेल्या त्रासाचा अपमान करणे नव्हता. त्यामुळे मी माफी मागतो.” असंही लॅपिड नदव म्हणाले. मात्र त्याआधी ते आपल्या वक्तव्यावर ठाम होते.

आणखी वाचा- ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांनी मागितली माफी; म्हणाले, “काश्मिरी पंडितांचा…”

नदाव लॅपिड यांनी माफी मागितल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना यावर प्रतिक्रिया केली आहे. ते म्हणाले, “नदाव आता काय म्हणतात किंवा काय नाही याने मला काहीच फरक पडत नाही. मी पुण्यात एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलो आहे आणि तिथेही मला माझ्या चित्रपटामुळे प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. लोक हा चित्रपट बनवल्याबद्दल माझं कौतुक करत आहेत, माझे आभार मानत आहेत. मला परदेशातून मिळणाऱ्या जाहिरातींची गरज नाही. कारण त्या लोकांना माझ्या देशाबद्दल काहीच माहिती नाही. जर त्यांना मनापासून वाटत नसेल तर ते जे काही बोलले त्याला माफी म्हणता येणार नाही.”

काय म्हणाले होते नदव लॅपिड?

‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त बोलताना इस्त्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर भाष्य केलं होतं. ते म्हणाले, “द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला ‘व्हल्गर’ (अश्लील) आणि ‘प्रोपगंडा’ ( प्रचारकी ) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे” असं लॅपिड यांनी म्हटलं होतं.

दरम्यान ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ९० च्या दशकात काश्मिर खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि हत्या याचं चित्रण करण्यात आलं आहे. कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 11:58 IST
Next Story
“मी ५७ वर्षांचा आहे पण…” शाहरुख खानने मुलाखतीदरम्यान व्यक्त केली मनातील खदखद