Neeta Lulla Talks about Sridevi : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आजही प्रेक्षक आवडीने त्यांचे चित्रपट पाहताना व त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. अशातच नुकतच बॉलीवूडमधील प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी श्रीदेवींसह काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला आहे. आजवर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध कलाकारांचे लूक डिझाइन केले आहेत. श्रीदेवी यांच्यासह काम करणं त्यांच्यासाठी खूप कठीण गेल्याचं म्हटलं आहे. यासह श्रीदेवींकडून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्याचंही म्हटलं आहे.

‘शोशा’सह संवाद साधताना नीता यांनी ‘लम्हे’ या चित्रपटासाठी श्रीदेवी यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. या चित्रपटात श्रीदेवीने दुहेरी भूमिका साकारली होती, ज्या एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. नीता यांनी या दोन्ही भूमिकेची स्टायालिंग करणं सोपं होतं, परंतु श्रीदेवी यांना रंग, कापड आणि स्टायलिंग याबद्दल चांगली माहिती असल्याने त्यांना जसं अपेक्षित होतं तसं काम करणं कठीण गेल्याचं सांगितलं आहे.

नीता लुल्ला श्रीदेवींबद्दल पुढे म्हणाल्या, “श्रीदेवीबाबत सांगायचं झालं तर कपड्यांच्या रंगांबाबत त्या विशेष लक्ष देत असत आणि माझ्यासाठी तेच खूप आव्हानात्मक होतं. ती अशी एक व्यक्ती आहे, ज्यांच्याकडून मी खूप शिकले आहे. त्यांच्याकडून स्टायलिंग, कपड्यांचे रंग, आउट डोअर, इन डोअर शूटसाठी कोणत्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य द्यायचं हे शिकायला मिळालं. कपड्यांचे रंग, मेकअप काही असो; सगळ्या गोष्टींबाबत त्या फार शिस्तप्रिय असायच्या.”

नीता लुल्ला यांनी पूर्वी ‘पीटीआय’शी संवाद साधताना श्रीदेवी यांचं कौतुक केलं आणि त्यांच्यासह त्यांनी जवळपास एक दशकाहून अधिक काळ काम केल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, “श्रीदेवी यांनी मला खूप प्रेरित केलं. त्यांनी मला खूप काही शिकवलं, मी त्यांच्यासह १२-१३ वर्षे काम केलं आहे. त्या काळात मी त्यांच्याकडून खूप काही शिकले आणि इंडस्ट्रीत नवीन असताना मला त्यांचा खूप आधार जाणवला.”