हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच कलाकारांनी, अभिनेत्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण असे फार कमी मराठमोळे दिग्दर्शक आहेत ज्यांना हिंदीतही तितकीच लोकप्रियता मिळाली आहे. महेश मांजरेकर आणि आशुतोष गोवारीकर ही त्यातली दोन प्रमुख नावं. त्यापैकी आशुतोष गोवारीकर यांनी अगदी मोजके चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज आशुतोष यांचा ६० वा वाढदिवस. ‘स्वदेस’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’पासून ‘मोहेंजो दारो’सारखे कित्येक भव्य अन् तितकेच आशयघन चित्रपट आशुतोष यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापैकी ‘लगान’ व ‘स्वदेस’ या दोन्ही चित्रपटांना न भूतो न भविष्यती असं घवघवीत यश मिळालं. ‘स्वदेस’ हा चित्रपट त्यामानाने कमी चालला पण ‘लगान’ने मात्र बॉक्स ऑफिसवरची गणितं बदलली. हे दोन्ही चित्रपट करण्याआधी जावेद अख्तर यांनी आशुतोष यांना या विषयांवर चित्रपट करण्यापासून रोखलं होतं. अशा विषयांवर चित्रपट काढू नका अशी तंबीच जावेद अख्तर यांनी आशुतोष यांना दिलेली. इतकंच नव्हे तर त्यांनी आमिर खानलादेखील ‘लगान’ न करण्याचा सल्ला दिलेला होता.

आणखी वाचा : जवळपास ५०० कोटींची कमाई करणारा शाहरुख खानचा ‘डंकी’ ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहायला मिळणार?

एका जुन्या मुलाखतीमध्ये आशुतोष गोवारीकर यांनी याबाबतीत खुलासा केला होता. ‘द बॉस डायलॉग’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आशुतोष यांनी त्यांच्या व जावेद अख्तर यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. जेव्हा आशुतोष ‘लगान’साठी गीतकार म्हणून जावेद अख्तर यांना कथा सांगायला गेले तेव्हा त्यांनी आशुतोष यांना थेट उडवून लावलं होतं.

याविषयी बोलताना आशुतोष म्हणाले, “मी जेव्हा ‘लगान’ची कथा त्यानं ऐकवली तेव्हा मी त्यांना प्रथमच भेटलो होतो. तेव्हा ते मला अत्यंत नम्रपणे म्हणाले की तुमच्या या कथेत ५ ते ६ समस्या आहेत. तुमचा हीरो धोतर परिधान करून नसलेला पाहिजे, ब्रिटिश राज्यकर्त्यांवर आणि क्रिकेटवर तुम्ही चित्रपट कधीच काढूच नका, अशा बऱ्याच नकारात्मक गोष्टी जावेद अख्तर यांनी तेव्हा मला सुचवल्या. पण मी त्यांना म्हणालो की चित्रपट बनला तर असाच बनेल. ते तेव्हा मला काही बोलले नाहीत, पण जेव्हा मी तिथून निघालो तेव्हा त्यांनी आमिरला फोन केला आणि त्याला बजावलं की हा चित्रपट अजिबात करू नकोस. सुदैवाने आमिरला माझ्यावर विश्वास होता अन् तो हा चित्रपट करायला तयार होता त्यामुळे त्याने जावेद अख्तर यांना या चित्रपटासाठी गाणी लिहायला तयार केलं.”

आणखी वाचा : “मला माझं करिअर संपवायचं आहे…”, किंग खान शाहरुख खानचं मोठं विधान

पुढे आशुतोष म्हणाले, “हीच गोष्ट ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’च्या वेळेसही घडली. मी जावेद अख्तर यांना कथा ऐकवायला गेलो अन् त्यांनी हे चित्रपट न करण्याचा सल्ला मला दिला. परंतु ते सगळे चित्रपट प्रेक्षकांना फार आवडले. परंतु एक चित्रपट असा होता ज्याची कथा जावेद अख्तर यांना खूप आवडली होती तो म्हणजे ‘खेले हम जी जान से’. अन् तो चित्रपट सपशेल आपटला. आता मी जेव्हा ‘मोहेंजो दारो’ची कथा त्यांना ऐकवेन तेव्हा हा चित्रपट बनवू नकोस असं ते म्हणाले पाहिजेत अशी अपेक्षा मला आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When javed akhtar told ashutosh gowariker to not make films like lagaan and swades avn