मराठीसह हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अश्विनी काळसेकर यांनी अभिनेते मुरली शर्मा यांच्याशी लग्न केलं. मुरली शर्मा हे बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमधील त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जातात. फिल्म इंडस्ट्रीतील या सुप्रसिद्ध जोडप्याच्या लग्नाला १६ वर्षे झाली आहेत, पण त्यांना मूल नाही.

अश्विनी काळसेकर काही शारीरिक समस्यामुळे आई होऊ शकल्या नाहीत. “खरं तर आम्ही बाळासाठी खूप प्रयत्न केले. पण मला किडनीची समस्या आहे. त्यावेळी सरोगसीची फॅशन नव्हती आणि आमच्याकडे तेवढे पैसेही नव्हते. आम्ही संघर्ष करत होतो, प्रयत्न करत होतो. त्यानंतर एक वेळ अशी आली की डॉक्टर म्हणाले, ‘तुझी किडनी भार उचलू शकत नाही. तर यामुळे एकतर तुझ्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होतील किंवा बाळावर होतील’. त्यानंतर डॉक्टरांनी पूर्णपणे नकार दिला. मग आम्ही सरोगसीसाठीही प्रयत्न केला नाही,” असं अश्विनी काळसेकर मूल नसण्याबाबत हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

“मला जे हवं होतं ते मिळू शकलं नाही. सगळी नशिबाची गोष्ट आहे. वाईट वाटतं, कारण मी पारंपरिक विचारांची आहे. मला बाईपणाचं एक पूर्ण वर्तुळ जगायचं होतं, पण ते नाही होऊ शकलं. कदाचित माझ्या नशिबात माझे सासू-सासे व आई-वडिलांची सेवा करणं लिहिलेलं होतं. तेही आता आमच्या मुलांसारखे आहेत, तर मी त्यांची सेवा करतेय,” असं अश्विनी काळसेकर यांनी म्हटलं होतं.

अश्विनी काळसेकर यांना प्राणी फार आवडतात. स्वतःची मुलं नसल्याने त्यांनी दोन श्वान पाळले आहेत. त्या श्वानांची मुलांसारखी काळजी घेतात. श्वान सांभाळायला त्यांनी एक नॅनी ठेवली आहे, असंही अश्विनी काळसेकर यांनी नमूद केलं होतं.

अश्विनी काळसेकर यांनी हिंदी मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेतून त्या घराघरांत पोहोचल्या. ‘हमारे बारह’, ‘जोधा अकबर’, ‘फू बाई फू’ आणि ‘फूंक’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंंय. अश्विनी काळसेकर यांचे पती मुरली शर्मा यांनी ‘विजेता’, ‘निन्नू कोरी’, ‘अतिथी’, ‘रामचारी’, ‘भले भले मगदिवोय’, ‘यशोदा’, ‘चारी 111’ यासारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.