Zeenat Aman Talks About Dum Maro Dum Song : झीनत अमन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आज त्या त्यांचा ७६वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण, त्या दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्याबरोबर काम केलेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आल्या.
हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील दम मारो दम हे गाणं त्या काळी खूप गाजलेलं. तर आजही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. अनेक तरुण आजही पार्ट्यांमध्ये त्या गाण्यावर थिरकताना दिसतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, या गाण्याच्या शूटिंगदरम्यान झीनत अमान यांनी नशेत असलेल्या लोकांबरोबर काम केलं होतं आणि त्यांनी स्वत:सुद्धा नशा केलेली, ज्यामुळे त्यांच्या आई खूप रागावलेल्या. ‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार अभिनेत्रींनी स्वत: याबद्दल एका पोस्टमधून माहिती दिली होती.
१९७१ मध्ये आलेल्या हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील ‘दम मारो दम’ या गाण्यासाठी झीनत अमान यांनी हातात चिलीम धरून अनेक लोकांसमोर नृत्य केलं होतं. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार एरवी अशा प्रकारच्या गाण्यांसाठी कलाकार फक्त नशेत असल्याचा अभिनय करतात. पण, त्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान झीनत अमान या खरोखर नशेत होत्या आणि त्यांच्याबरोबर जे लोक नृत्य करीत होते, तेसुद्धा नशेत होते. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या या प्रसिद्ध गाण्यामागचा किस्सा जाणून घेऊयात.
झीनत आमन यांनी सांगितलेला दम मारो दम गाण्यामागचा किस्सा
झीनत यांनी स्वतः त्यांच्या एका पोस्टमध्ये याबद्दल सांगितलेलं. त्यांनी लिहिले, “आम्ही काठमांडूमध्ये ‘हरे रामा हरे कृष्णा’चे चित्रीकरण करीत होतो आणि देवसाहेबांनी रस्त्यावरून हिप्पींचा एक गट गाणे गाण्यासाठी एकत्र केला होता. ‘दम मारो दम!’ हे ते गाणे होते. हिप्पी खूप आनंदी होते. त्यांना केवळ चरस मिसळलेली चिलीम पिण्याची संधी मिळत नव्हती. त्यांना बॉलीवूड चित्रपटात काम करण्यासाठी मोफत जेवण आणि पैसेदेखील मिळत होते.”
झीनत यांनी पुढे लिहिलेलं, “देव आनंद यांना हा सीन खूप खरा वाटेल, असा करायचा होता. माझं पात्र असलेल्या जेनिसला नशेत दाखवायचं होतं. त्यासाठी हिप्पींबरोबर नशेत वावरणं हा एक सोपा उपाय होता. मी त्यावेळी लहान होते आणि सलग रिटेक घेत असल्याकारणाने त्यांच्या चिलीममधून सारखा धूर यायचा. जेव्हा काम संपलं, तोवर मी पूर्णपणे नशेत होते. त्यामुळे मला हॉटेलवर जाणंही शक्य नव्हतं. म्हणून टीममधील काही लोकांनी मला गाडीत बसवलं आणि ते एका सुंदर ठिकाणी घेऊन गेले तेव्हा तेथील हिमालयाचे दृश्य पाहून मी हळूहळू शांतपणे शुद्धीत आले.”
झीनत यांच्या आई त्यामुळे खूप रागावल्या होत्या, असं अभिनेत्रींनी स्वत: पोस्टमधून सांगितलं होतं. अभिनेत्री त्याबद्दल म्हणालेल्या, “मला नंतर कळलं की, जेव्हा माझ्या आईला समजलं तेव्हा तिला खूप राग आलेला आणि तिच्या छोट्या मुलीला ड्रग्जचं सेवन करण्याची परवानगी दिल्यानं ती क्रू मेंबर्समधील ज्येष्ठ लोकांवर खूप ओरडली होती. सुदैवानं मी तिच्या रागापासून वाचलेले.”
झीनत अमान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. काही वर्षांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचं अकाउंट सुरू केलं होतं आणि त्या त्यांच्या चित्रपटांसंबंधित असे किस्से शेअर करीत असतात.
