नेटफ्लिक्सची अतिशय लोकप्रिय वेब सीरिज म्हणजे ‘मनी हाइस्ट’. ही एक स्पॅनिश वेब सीरिज असून या वेब सीरिजला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ही वेब सीरिज स्पॅनिश, हिंदी, इंग्रजी बरोबरच अनेक भाषेत तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला माहिती आहे का? की या वेब सीरिजचा पहिला सिझन फ्लॉप ठरला होता?
‘मनी हाइस्ट’ या वेब सीरिजचे मूळ नाव ‘कासा डी पॅपेल’ आहे. हा एक असा शो आहे ज्याचा पहिला सिझन प्रेक्षकांना अजिबात आवडला नव्हता. या सीरिजच्या कलाकारांना आणि क्रू ला ‘कासा डी पॅपेल’च्या सेटवर परत येण्याची अपेक्षा नव्हती. त्यांनी घेतलेली मेहनत स्पॅनिश प्रेक्षकांना फारशी आवडली नाही. मात्र या सीरिजचा दूसरा सिझन संपल्यानंतर जेव्हा नेटफ्लिक्सने याचे जागतिक पातळीवर प्रदर्शित करायचे अधिकार विकत घेतले तेव्हा या सीरिजला नवीन जीवन मिळाले. नेटफ्लिक्सवर ही सीरिज स्पॅनिश भाषेत होती, बघता बघता या शोची लोकप्रियता वाढली आणि याचे डब् व्हर्जन देखील आले.
‘कासा डी पॅपेल’ या मोठ्या सीरिजची २२ भागात विभागणी करण्यात आली आणि कोणत्या ही प्रकारचे प्रमोशन न करता ‘मनी हाइस्ट’ या नावाने ही सीरिज जगभर प्रसारित करण्यात आली. बघता बघता या वेब सीरिजला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला, यातील प्रत्येक कलाकाराचे, त्यांच्या अभिनयाचे कौतुक व्हायला सुरूवात झाली. चाहते बॅनर, पोस्टर, रील, टिकटॉक व्हिडीओ बनवायला लागले आणि अक्षरश: क्रेझी झाले आहेत. ‘मनी हाइस्ट’ नेटफ्लिक्सवर येताच त्याने सगळे रेकॉर्डस मोडले. जगातील टॉप शोच्या यादीत या सीरिजचा समावेश झाला आणि आयएमडीबीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केलं. या टीमला २०१८ मध्ये सर्वोकृष्ट सीरिजसाठी एमी हा मानाचा पुरस्कार देण्यात आला असून अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील कलाकारांनी याची दाखल घेतली. तर फुटबॉलपटू नेयमार तिसऱ्या सीझनमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. दरम्यान, लाल रंगाचा जंप सूट आणि साल्वाडोर डाली मुखवट्यांना राजकीय रॅली आणि निषेधाचे प्रतीक बनले. याचे एंथम ‘बेला चाओ’ या गाण्याच्या आज वेगवेगळ्या भाषेत हजारपेक्षा जास्त आवृती आहेत.
‘मनी हाइस्ट’ची लोकप्रियता पाहून नेटफ्लिक्सने या सीरिजच्या निर्मात्यांना आणखीन दोन सिझनसाठी ऑफर दिली. त्यानंतर जवळ जवळ दोन महिन्यांनी त्यांनी नवीन प्लॉट तयार केला आणि नंतर जगभर या सीरिजचे चित्रीकरण करण्यात आले. आज ‘मनी हाइस्ट’ ही जगातली सर्वात जास्त पाहिली जाणारी वेब सीरिज ठरली आहे. ‘मनी हाइस्ट’चा नवीन सिझनसाठी काही दिवस उरले आहेत आता सगळ्यांना उत्सुकता आहे की पुढे काय होणार. प्रोमोज आणि ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यात नेटफ्लिक्सने ‘मनी हाइस्ट’च्या भारतीय फॅन्ससाठी ‘बेला चाओ’ या त्यांच्या एंथमचे देसी व्हर्जन तयार केलं आहे. या गाण्याला ‘जल्दी आओ’ असे नावं देण्यात आलं आहे. ‘बेला चाओ’ या गाण्याचे देसी व्हर्जनमध्ये भारतीय फॅन्स या सीरिजसाठी किती उत्सुक आहेत ते दाखवण्यात आले आहे. या सुपर हिट वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’चा पाचवा आणि शेवटचा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्याचा पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.