Geeta Basra Opens Up About Two Miscarriages : हरभजन सिंग आणि गीता बसरा यांनी २०१५ मध्ये लग्न केले आणि २०१६ मध्ये त्यांची मुलगी हिनायाचा जन्म झाला. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गीताने तिच्या मुलीच्या जन्मानंतर झालेल्या दोन गर्भपातांबद्दल आणि त्याचा तिच्या भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम झाला याबद्दल सांगितले.

हॉटरफ्लायशी झालेल्या संभाषणात, गीता बसराने खुलासा केला की, तिला नेहमीच दोन मुले हवी होती आणि तिची पहिली गर्भधारणा खूप सुरळीत झाली असल्याने तिला दुसऱ्या गर्भधारणेत कोणत्याही अडचणींची अपेक्षा नव्हती. तिने सांगितले, “मी दोनदा प्रयत्न केला आणि दोन गर्भपात झाले आणि तो खूप कठीण काळ होता, ‘मी तंदुरुस्त होते, मी योगा करत होते, मी बरोबर खात होते, मग काय चूक असू शकते, माझा गर्भपात का होत होता, हेच मला कळत नव्हते.”

गीता पुढे म्हणाली, “पण जेव्हा ते घडले तेव्हा मला खूप धक्का बसला. मी विचार केला, मला हे कधीच अपेक्षित नव्हते, कारण हिनायाच्यावेळी असे काही झाले नाही.” ती म्हणाली की तिच्या पहिल्या बाळाच्या वेळेस तिला कोणताही त्रास झाला नाही, सगळं नीट झालं. परंतु, “जेव्हा मी तीन वर्षांनी गर्भवती राहिले आणि गर्भपात झाला तेव्हा मला ते अपेक्षित नव्हते.”

जेव्हा तिचा गर्भपात झाला तेव्हा हरभजन सिंग कुठे होता?

गीता बसरा म्हणाली की मूल गमावणे कठीण आहे, परंतु ते सहन करण्यासाठी मानसिक शक्ती लागते. यावेळी तिने हरभजनच्या पाठिंब्याबद्दलही सांगितले, “जेव्हा माझा पहिला गर्भपात झाला तेव्हा तो पंजाबमध्ये होता, म्हणून तो दुसऱ्या दिवशी आला. माझे रुग्णालयात एक छोटेसे ऑपरेशन करायचे होते, त्यामुळे तो त्या काळात माझ्याबरोबर होता.”

गीता बसरा आणि हरभजन सिंग या दोघांना आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विशेष म्हणजे मुलांना सांभाळण्यासाठी तिने सिनेसृष्टी सोडली. गीता बसराने २९ ऑक्टोबर २०१५ रोजी हरभजन सिंगबरोबर लग्न केलं. या विवाहसोहळ्यात त्यांचे काही मित्रमंडळी आणि कुटुंबीय सामील झाले होते.