Hema Malini Net Worth : अभिनेत्री हेमा मालिनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत; पण यावेळी त्या चित्रपट किंवा राजकारणामुळे नाही, तर त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या व्यवहारामुळे चर्चेत आहेत. खरं तर, अलीकडेच त्यांनी अंधेरी पश्चिमेतील ओशिवराच्या पॉश ओबेरॉय स्प्रिंग्स सोसायटीमधील त्यांच्या दोन आलिशान अपार्टमेंट विकल्या आहेत. त्याशिवाय गणेशोत्सवादरम्यान त्यांनी एक नवीन कारदेखील खरेदी केली आहे. त्याबरोबरच या अभिनेत्रीकडे किती कोटी रुपयांची मालमत्ता आहे हेदेखील जाणून घेऊया.

स्क्वेअर यार्डसनुसार, ऑगस्ट महिन्यातच त्यांनी व्यवहार केला. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मुंबईतील ओशिवरा परिसरातील दोन अपार्टमेंट एकूण १२.५० कोटी रुपयांना विकल्या आहेत. या अपार्टमेंट पॉश ओबेरॉय स्प्रिंग्ज सोसायटीमध्ये आहेत. प्रत्येक अपार्टमेंटचा कार्पेट एरिया ८४७ चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया १,०१७ चौरस फूट आहे. दोन्ही घरे प्रत्येकी ६.२५ कोटी रुपयांना विकली गेली आणि त्यात कार पार्किंगची जागादेखील समाविष्ट आहे.

याबरोबरच दोन्ही व्यवहारांवर सुमारे ३१.२५ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांचे नोंदणी शुल्कदेखील भरण्यात आले. ओबेरॉय स्प्रिंग्ज हे मुंबईतील सर्वांत प्रीमियम निवासी केंद्रांपैकी एक आहे, जिथे अनेक कलाकार राहतात. उत्कृष्ट स्थान, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि मेट्रोशी चांगली कनेक्टिव्हिटी यांमुळे हा परिसर गुंतवणूक आणि लक्झरी जीवनशैलीच्या दृष्टीने खूप खास मानला जातो.

हेमा मालिनी नेट वर्थ

हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती ही १२२ कोटी आहे. त्यांच्याजवळ आधीपासून ६१ लाखांच्या कार आहेत. आता आणखी एक लक्झरी कार त्यात सामील झाली आहे. हेमा मालिनी या लोकसभा सदस्यही आहेत. त्या मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.

त्याशिवाय अभिनेत्रीकडे जय हिंद सहकारी सोसायटी (मुंबई)मधील जमीन आणि पल्स हाऊस, गोखले रोड (मुंबई)वरील एक फ्लॅट, चेन्नईमध्ये एक फ्लॅट आणि वृंदावनमधील ओमॅक्स सिटीमध्ये एक बंगला अशा अनेक मालमत्ता आहेत.

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर ७५ लाख रुपयांची आलिशान कार खरेदी केली आहे. हेमा मालिनी यांनी नवीन एमजी एम9 (MG M9) कार खरेदी केली आहे. कारची पूजा करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. ड्रीमगर्ल, अशी ओळख असलेल्या हेमा मालिनी वयाच्या ७६ व्या वर्षीही तितक्याच अॅक्टिव्ह आहेत. हेमा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात खूप लहान वयात केली होती. हेमा यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दमदार अभिनयाबरोबरच हेमा त्यांच्या सौंदर्यासाठीही ओळखल्या जातात.