करण जोहर आणि जान्हवी कपूर हे ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या टॉक शोच्या नवीनतम भागात दिसले. काजोल आणि ट्विंकलने जान्हवी आणि करणबरोबर मजेदार संवाद साधला, ज्यामुळे अनेक मनोरंजक खुलासे पुढे आले.

जान्हवीने तिची आई श्रीदेवी यांच्याबद्दल काही आश्चर्यकारक खुलासे केले. जान्हवीने शोमध्ये कबूल केले की, तिची आई श्रीदेवी यांना जान्हवीने अभिनय करावा असे कधीच वाटत नव्हते. ती म्हणाली की, स्वतः एक अभिनेत्री असल्याने तिची आई तिचे खूप संरक्षण करायची. जान्हवी कपूर पुढे म्हणाली, “प्रत्येक जण आमच्या आयुष्यात खूप गुंतलेला होता आणि त्यावेळी माझी आई खूप कडक होती. ती म्हणायची, ‘तू अभिनेत्री बनावेस, असे मी इच्छित नाही.’ जान्हवी म्हणाली, “माझ्यासाठी तो सर्वांत वाईट काळ होता. कारण- मी मोठी होत असताना सोशल मीडियाची पोहोचदेखील वाढत होती.”

तिच्या दिवंगत आईबद्दल बोलताना ती इतकी भावनिक झाली की, तिने शोमध्ये एक हृदयस्पर्शी कविताही शेअर केली. श्रीदेवींनी त्यांच्या कारकि‍र्दीत ‘आग और शोला’, ‘नगिना’, ‘चालबाज’, ‘घर संसार’, ‘मॉम’, ‘इंग्लिश विंग्लिश’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. श्रीदेवी यांचे २०१८ मध्ये निधन झाले.

श्रीदेवी ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यावेळी त्यांनी केलेले सिनेमे आजही लोक आवडीने पाहताना दिसतात. तर त्यांच्यानंतर आता त्यांच्या दोन्ही मुली अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत.

जान्हवी कपूरने आपल्या दमदार स्टाईल आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या जान्हवी कपूरने अवघ्या काही चित्रपटांमध्ये काम करीत यशाचे शिखर गाठले आहे.

जान्हवी बऱ्याच काळापासून शिखर पहारियाला डेट करीत आहे. दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करतात आणि सुटीवरही जातात. दोघेही शाळेतील मित्र आहेत. जान्हवी सध्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात दिसत आहे. यापूर्वी ती ‘परम सुंदरी’ या चित्रपटात दिसली होती. पुढील वर्षी ती राम चरणबरोबर ‘पेड्डी’ या दक्षिणेतील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.