Amruta Khanvilkar : ‘चंद्रा’ किंवा ‘वाजले की बारा’ ही गाणी आठवली तरी डोळ्यासमोर अमृता खानविलकरचं नाव येतं. आजवर तिने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. अभिनयाबरोबरच अमृता तिच्या दमदार नृत्यकलेसाठीही ओळखली जाते.

२००४ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स खोज’ या शोमधून अमृताने कलाविश्वात आपलं पहिलं पाऊल ठेवलं. यानंतर ‘गोलमाल’ या चित्रपटातून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. या संपूर्ण काळात आपल्या दमदार अभिनयासह अमृताने तिच्या नृत्याने देखील सर्वांचं मन जिंकून घेतलं. ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’ ते हिंदी कलाविश्वात अमृताने थेट आलिया भट्टच्या ‘राझी’मध्ये तिच्या वहिनीच्या भूमिका साकारली होती. तिच्या २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती. 

करिअरच्या या सगळ्या प्रवासात अमृताला तिच्या कुटुंबाची व पती हिमांशू मल्होत्राची खंबीर साथ मिळाली. वैयक्तिक आयुष्यात अमृता व हिमांशूने एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.

अमृताने सोशल मीडियावर नुकतंच ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी अमृताला, “हिमांशूबद्दल एका शब्दात काय सांगशील” असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. यावेळी अभिनेत्रीने नवऱ्याचे पाच गुण सांगितले.

“अमेझिंग, धार्मिक, चांगला माणूस, खूप हुशार, माझा सर्वात मोठा आधार” असे नवऱ्याचे पाच गुण सांगत अमृताने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने अमृताला, “हिमालय की सह्याद्री तुला कोणत्या पर्वतरांगा आवडतात?” असा प्रश्न विचारला. यावर अमृताने, “सध्या तरी ‘एकम’ माझं स्वत:चं घर मला आवडतंय” असं उत्तर दिलं.

अमृता खानविलकरची हिमांशूसाठी पोस्ट ( Amruta Khanvilkar )

दरम्यान, अमृता खानविलकर प्राजक्ता माळी नुकत्याच केदारनाथला जाऊन आल्या. केदारनाथहून आल्यावर अभिनेत्रीची प्रकृती बिघडली असून सध्या अमृता डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे. त्यामुळे केदारनाथ यात्रेला जाण्याआधी काळजी घ्या, ORS तुमच्याबरोबर कायम ठेवा असं आवाहन अभिनेत्रीने चाहत्यांना केलं आहे.